Almatti Dam Height : अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधी; काय करणार सांगा? हसन मुश्रीफांची राज्य सरकारकडे विचारणा
हसन मुश्रीफ यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का? याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का? अशी विचारणा राज्य सरकारला केली.
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या मुद्यावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी (MlA Hasan Mushrif on Almatti Dam Height in nagpur winter session) बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का? आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का? अशी विचारणा राज्य सरकारला केली.
हसन मुश्रीफ म्हणाले की, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. याप्रमाणे अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल. महाराष्ट्राच्या सीमेपासून 235 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटकने अलमट्टी धरण बांधले आहे. या धरणामध्ये पाणी साठवण सुरुवात झाल्यापासून 2005, 2009, 2013 आणि 2019 असा चारवेळा महापूर आला आहे. यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. असे असतानाही कर्नाटक सरकारने या धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भिंत वगैरे बांधलेली आहे, फक्त 26 गेट बसवणे बाकी असून त्यासाठी त्यांनी निविदाही काढली आहे, 269 दिवसांमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत आहे.
न थांबवल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ
लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहाचे जेष्ठ सदस्य मुश्रीफ यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाने नेमलेल्या तेजो वाकास इंटरनॅशनल या कंपनीनेही उंची वाढवण्याला समर्थन केले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या समितीने सुरुवातीला अलमट्टी धरणामुळे महापूर येत नसल्याचा निर्वाळा दिला. परंतु नंतरच्या काळात कर्नाटकने घातलेल्या बंधार्यांमुळेच महापूर येत असल्याचे स्पष्टीकरण नंदकुमार वडनेरे समितीने दिले आहे. त्यामुळेच, या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक सिम्युलेशन मॉडेल तयार केलेले आहे. त्यातून वास्तववादी निष्कर्ष समोर येतील. कर्नाटकला आमच्या अभ्यासातून निष्कर्ष येईपर्यंत हे काम थांबवण्याच्या सूचना करू, त्यांनी ते न थांबवल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ.
दरम्यान, लक्षवेधी मांडताना मुश्रीफ पुढे म्हणाले, अलमट्टी हे धरण कृष्णा नदीवर आहे. कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सुटल्यानंतर पंचगंगा, वारणा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांचे पाणी कृष्णा आतच घेत नाही. त्यामुळेच कोल्हापूर, सांगली इचलकरंजी या मोठ्या शहरांसह संपूर्ण शिरोळ तालुका व नद्यांवरील गावेच्या- गावे पाण्याखाली जातात. यावर कर्नाटकचे म्हणणे आहे की लवादाने आम्हाला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे लवादाने परवानगी कशी दिली? महाराष्ट्र सरकारने आक्षेप का घेतला नाही? त्यानंतर कृष्णा पाणी तंटा लवादाने नेमलेल्या तेजो वाकास या कमिटीनेही उंची वाढवायला हरकत नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. एकतर कर्नाटक सरकारला सांगून ही उंची वाढविण्याचे काम तात्काळ थांबवण्याची गरज आहे आणि आंध्र सरकारप्रमाणेच आपणही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे. (MlA Hasan Mushrif on Almatti Dam Height)
इतर महत्वाच्या बातम्या