Bhandara News : विवाहितेची दोन चिमुकल्यांसह वैनगंगा नदीत उडी, पोलीस तपासात आत्महत्येचे कारण समोर, नवरा अटकेत
Bhandara News : विवाहितेने दोन चिमुकल्यांसह वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे
Bhandara News : तीन दिवसांपूर्वी भंडारा (Bhandara) जिल्ह्यामध्ये ह्रदय हेलावणारी घटना घडली होती. संतापाच्या भरात एका विवाहितेने दोन चिमुकल्यांसह वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती मिळाली होती. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.
मुलींच्या रंगावरून पत्नीचा छळ
भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील तिड्डी गावात दीपाली शितलकुमार खंगार (वय 27 वर्ष) असं मृत आईचं नाव असून देवांशी खंगार (वय 3 वर्ष) आणि वेदांशी खंगार (वय दीड वर्ष) मुलींना घेऊन नदीत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती, यामागचं कारण आता समोर आलं आहे, या विवाहितेला दोन्ही मुली झाल्या. या मुली रंगाने सावळ्या असल्याने पतीकडून पत्नीचा नेहमी छळ होत होता. पतीच्या नेहमीच्या बोलण्याला आणि होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मुलींच्या रंगावरून पत्नीचा छळ करणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे.
भंडाऱ्यात ह्रदय हेलावणारी घटना
तिड्डी गावातील रहिवासी दीपाली यांनी आपल्या दोन मुलींसह 14 ऑक्टोबर रात्री 12 वाजता तिड्डी इथून जाणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. तर 15 ऑक्टोबरला सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरता भंडारा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आला असून कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पतीला अटक
दिलीप मारबते याने दिलेल्या तक्रारीवरून पती शितल बाळकृष्ण खंगार (३२) रा. तिड्डी याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि 306 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कारधा पोलिसांनी आरोपी पती शितल याला अटक केली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील करीत आहे. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून दीपालीचा नेहमी छळ होत होता. हा प्रकार तिने आपल्या माहेरीही सांगितला होता. परंतु तिची समजूत काढण्यात आली होती. आरोपी पती शितल नेहमी दोनही मुलीच झाल्या. त्याही सावळ्या रंगाच्या असे म्हणून तिचा छळ करीत होते. त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले आपल्या मागे आपल्या चिमुकल्यांचे काय होणार म्हणून त्या दोघांनाही घेवून तिने वैनगंगेत उडी घेतली
घरगुती हिंसाचार कायदा काय सांगतो?
महिलांसोबत होणाऱ्या घरगुती हिंसाचाराशी संबंधित एक कायदा आहे. हा कायदा 2005 मध्ये बनवण्यात आला होता. यामध्ये शारिरीक, आर्थिक, भावनिक आणि मानसिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कायदे तयार करण्यात आले. या तक्रारी अशा प्रकारचा छळ होणाऱ्या महिलाच करू शकतात.
संबंधित बातमी
Nashik : धक्कादायक! सासरच्या त्रासाला कंटाळली, सिन्नरमध्ये विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल