Bhandara News : भंडाऱ्याच्या हिंदुस्तान कंपोझिट्स कंपनीत भीषण आग; कोट्यवधींचं साहित्य आगीत जळून खाक
Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील राजेगाव एमआयडीसीत असलेल्या हिंदुस्तान कंपोझिट्स कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. अचानक लागलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Bhandara News: भंडारा : भंडारा जिल्ह्यातील राजेगाव एमआयडीसीत असलेल्या हिंदुस्तान कंपोझिट्स कंपनीमध्ये भीषण आग (Fire) लागली. अचानक लागलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या कंपनीत टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचं क्लच प्लेट्स, ब्रेक लायनर आणि अन्य साहित्य बनविण्यात येतं होतं. या आगीत कंपनीतील मशीनरीज आणि कच्चा साहित्यासह कामगारांनी तयार केलेलं इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाली. आज 27 जानेवारीच्या दुपारी कंपनीच्या डीबीडब्लू प्लांट मध्ये ही आग लागली. आग नियंत्रित करण्यासाठी भंडारा (Bhandara News), लाखनी आणि साकोली इथून अग्निशमन दल पाचारण करण्यात आलं. बराच वेळ अथक प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कंपनीला दोन दिवसांच्या सुट्ट्या असल्याने इथं कुठलाही कामगारवर्ग नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
दिवसभरातील दुसरी भीषण घटना
भंडाऱ्या जिल्हात आज 27 जानेवारीलाच दोन वेगवेगळ्या भीषण घटना घडल्या आहेत. भंडारा शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सीएक्स विभागात हा स्फोट झाला. या दुर्घटनेत अविनाश भागवत मेश्राम (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू झाली होती. सीएक्स विभागात बारुदचे कोट तयार करण्याचे काम केले जाते, तिथं हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्राम हे एकटेच होते. त्यामुळे त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
ही घटना ताजी असतांनाच दुपारी भंडारा जिल्ह्यातील राजेगाव एमआयडीसीत असलेल्या हिंदुस्तान कंपोझिट्स कंपनीमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने कंपनीला दोन दिवसांच्या सुट्ट्या असल्यानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती सामोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग नियंत्रणात आली आहे. या आगीच्या घटनेचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहे.
अमरावती मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन हॉटेलला भीषण आग
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हिवरखेड येथे आज दुपारच्या सुमारास सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत तीन ते चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हॉटेलमध्ये आगीने रुद्रारूप धारण केले होते. अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या आगीत हॉटेल जळून खाक झाली असून यामध्ये दहा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. गजानन वाघमारे यांच्या हॉटेलला ही आग लागली आसून या आगीत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या