Bhandara: डबल मर्डरने भंडारा शहर हादरलं! भर चौकात लस्सी दुकानदाराची हत्या; जमावाकडून हत्येखोराला जबर चोप अन्...
Bhandara News: रविवारी भंडारा शहरात डबल मर्डरचा प्रकार घडला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
Crime News: भंडारा शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या गांधी चौकात रविवारी (28 मे) रात्री हत्येचा थरार घडला. गांधी चौकात आपसी वादातून झालेल्या मारहाणीत लस्सी विक्रेता अमन नांदूरकर (वय 23 वर्ष) या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. तर, या हल्ल्यानंतर संतप्त जमावाने हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक साठवणे हा तरुण गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी नागपूरला नेले असता उपचारादरम्यान त्याचा नागपुरात मृत्यू झाला.
दोन जणांच्या हत्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन वेगवेगळे खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत, या प्रकरणात पोलिसांनी काल तिघांना अटक केली होती. तर, आता पुन्हा एका अल्पवयीन मुलासह आणखी सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. यात अमन नांदुरकर याच्या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांना, तर अभिषेक साठवणे याच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
डबल मर्डरच्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आता भंडाऱ्यात तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमन नांदूरकर हा गांधी चौकातील आदर्श टॉकीजसमोर दुर्गा लस्सीचे दुकान चालवत होता. शनिवारी अमनच्या लस्सी सेंटरवर विकी मोगरे आणि विष्णू उर्फ बा याने अमनसोबत भांडण करून त्याला चोप दिला. शनिवारी झालेल्या भांडणानंतर अमन दुकान बंद करून घरी गेला.
रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विकी मोगरे, विष्णू उर्फ बा त्याच्या काही सहकाऱ्यांसह वाद मिटवण्यासाठी अमनच्या दुकानात पोहोचले. मात्र, वाद मिटण्याऐवजी आणखी विकोपाला गेला. प्रकरण पुढे एवढं वाढलं की, आरोपी अभिषेक साठवणे याने रागाच्या भरात त्याच्याजवळील चाकू अमनच्या पोटात खुपसला आणि अमनवर वार केले. अमन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि घटनास्थळी उपस्थित अमनचे वडील, काका, त्याचा मित्र आणि इतरांनी अभिषेकच्या हातातील चाकू हिसकावला. परिसरातील जमावाने अभिषेकला पकडून मारहाण केली. अमन आणि अभिषेकला जिल्हा रुग्णालयात नेले. अमनला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर रागाच्या भरात जमावाने अभिषेकला बेदम मारले, उपचारादरम्यान सोमवारी (29 मे) सकाळी अभिषेकचा देखील मृत्यू झाला.
अटकेतील आरोपींची नावं
अमन नांदुरकर हत्या प्रकरणी
निशांत रामटेके
साहिल मालाधरे
अतुल तांडेकर
अजय मानकर
कुशल लोखंडे
17 वर्षीय अल्पवयीन मुलगा
अभिषेक साठवणे हत्या प्रकरणी
आकाश जैस्वाल
अभिषेक गायधनी
आकाश कडूकर
शुभम बडवाईक
हेही वाचा:
New Delhi: दारू पिऊन दोन मैत्रिणींमध्ये झाला वाद; एकीने चाकूने वार करून दुसरीचा केला खून