Bhandara News : भंडाऱ्यात 30 भाविकांना अन्नातून विषबाधा;धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद खाल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली
Bhandara News : भंडाऱ्यात 30 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाविकांना उपचारासाठी जवळचं असलेल्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.

Bhandara News : भंडाऱ्यात 30 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद सेवन केल्यानंतर जवळचं असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ली. यानंतर जवळ जवळ 30 भाविकांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर भाविकांना उपचारासाठी जवळचं असलेल्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी प्रसाद आणि पाणीपुरी खाल्ल्यानं त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सुकळी देव्हाडी या गावात हा प्रकार रविवारला घडला असून त्यानंतर सोमवारी, तर काहींची मंगळवारी प्रकृती बिघडल्यानं दोन दिवसानंतर हा प्रकार मंगळवारीरात्री समोर आला आहे. सुकळी इथं रविवारी एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला. प्रसादाच्या सेवनानंतर पाणीपुरी खाल्ली, यामुळं सुमारे 30 जणांना हगवण, उलटी आणि पोटदुखी व्हायला लागली. यातील काहीना जवळच्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर, काहींवर भंडारा, तुमसर आणि आंधळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून अन्नातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आंतरराज्यीय गांजा तस्करांना तुमसर पोलिसांनी अटक
मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात गांजा घेऊन आलेल्या दोन आंतरराज्यीय गांजा तस्करांना तुमसर पोलिसांनी अटक केली. दोन्हीही गांजा तस्कर भंडार्यात गांजा घेऊन येत असल्याची माहिती तुमसर पोलिसांना मिळाली होती. तुमसरच्या खापा चौकात सापळा रचून या दोघांना थांबवून त्यांच्या झडती घेतली असता दुचाकीच्या सीटखाली हा गांजा लपवून त्याची वाहतूक करीत असल्याचं निष्पन्न झालं. या कारवाईत तुमसर पोलिसांनी भुरा सिंग धाकड (४५) आणि यशवंत सिंग धाकड (२५) दोघेही रायसेन मध्यप्रदेश या दोघांनांही ताब्यात घेत त्यांच्याकडून एका दुचाकीसह साडेसहा किलो गांजा असा १ लाख ८१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तुमसर शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली
कुबेर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडाराच्या तुमसर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. वाहनांमधून पडणाऱ्या वाळूवरून वाहनं भरधाव जात असल्यानं तुमसर शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दिवसभरात शेकडो ट्रक, ट्रिप्पर आणि ट्रॅक्टर शहरातून धावत असल्यानं नागरिकांना श्वसन, डोळ्याचे आजार, सर्दी, खोकला यासह विविध आजारांचा धोका निर्माण झालाय. हवेची गुणवत्ता ढासळल्यानं शहरातून आवागमन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सराफा आणि धानाची व्यापारपेठ म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेल्या तुमसरात आता वाळूचीही मोठी वाहतूक होत असल्यानं त्यातून धावणाऱ्या वाहनांमुळेचं हवेची गुणवत्ता ढासळल्याचा रोष नागरिक व्यक्त करीत आहे.
हे ही वाचा






















