ChatGPT vs Autowala : कन्नडमध्ये ऑटो ड्रायव्हरसोबत हुज्जत, बेंगळुरूच्या विद्यार्थ्याची अनोखी शक्कल, ChatGPT मुळे अखेर ठरला सौदा! व्हिडिओ तूफान व्हायरल
Bengaluru ChatGPT vs Autowala : बेंगळुरूमध्ये कन्नड भाषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, एका प्रवाशाने OpenAI च्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॅप चॅटजीपीटी (ChatGPT) वापरून एक अनोखा उपाय शोधून काढला आहे.

‘ChatGPT vs Autowala’: बेंगळुरूमध्ये (Bengaluru) कन्नड भाषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, एका प्रवाशाने OpenAI च्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अॅप चॅटजीपीटी (ChatGPT) वापरून एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, या प्रवाशाने ऑटो-रिक्षाचे (Autowala) भाडे ठरवण्यासाठी चक्क एआयची प्रभावी मदत घेतलीय. AI चा पुरेपूर वापर करत भाड्याची वाटाघाटी केलीय. शिवाय भाषेची समस्याही दूर केली आहे. या अतिशय शांततापूर्ण पद्धतीच्या वादाचे अन् या कल्पकतेचे खूप कौतुक सध्या सोशल मीडियावर केलं जात आहे.
AIच्या मदतीने वाटाघाटी, नेमका संवाद काय?
व्हिडिओमध्ये, प्रवाशाने Chat GPT ला सांगितले, "हाय ChatGPT, मला बेंगळुरूमध्ये एका ऑटो ड्रायव्हरशी बोलण्यासाठी मदत हवी आहे. ड्रायव्हर 200 रुपये मागत आहे आणि मी एक विद्यार्थी आहे. कृपया मला तुमच्याशी 100 रुपयांत बोलू द्या." ऑटो चालकाने प्रथम 200 रुपये मागितले, नंतर ते 150 रुपयांवर आले. प्रवाशाच्या विनंतीवरून, भाडे आणखी 30 रुपयांनी कमी करण्यात आले आणि शेवटी 120 रुपयांवर सहमती झाली. यावर चालक म्हणाला, "मी ते 200 वरून 150 पर्यंत आलोय, या नंतर 120 पर्यंत भाडे कमी केले. ते यापेक्षा कमी असू शकत नाही." आणि अखेर हा प्रवास 120 रुपयात ठरला.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
एआयच्या (AI) मदतीने हे संभाषण यशस्वी झाले. प्रवाशाने 120 रुपयांचे भाडे देण्यास सहमती दर्शवली आणि तो ऑटोमध्ये चढला अन् तो त्याच्या इच्छित स्थानाकडे निघाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान वायरल होत असून अनेक प्रतिक्रिया ही उमटत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी सोशल मिडियावर प्रवाशाचे कौतुक केलंय. सोबतच एका युजरने लिहिले की, " यामुळे आता कन्नड बोलण्याची समस्या सुटली." तर दुसरा म्हणाला, "एआयचा हा खरा वापर आहे, मी तुमच्या वागण्याचे कौतुक करतो." लोकांना हा शांत आणि हुशार दृष्टिकोन खूप आवडला आहे.
भाषेवरुन वाद- विवाद
अलीकडेच बेंगळुरूमध्ये भाषेबाबत आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका पुरूष आणि ऑटो चालकामध्ये जोरदार वाद झाला. व्हिडिओमध्ये तो माणूस रागाने ड्रायव्हरला म्हणाला, "जर तुम्हाला बेंगळुरूमध्ये राहायचे असेल तर हिंदी बोला." त्याच्या मित्रांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावर ऑटोचालक म्हणाला, "तुम्ही बंगळुरूला आला आहात, तुम्हाला कन्नड बोलायला हवे. मी हिंदी बोलणार नाही." हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला हे स्पष्ट नाही, परंतु त्या माणसाच्या विधानामुळे सोशल मीडियावर, विशेषतः कन्नड भाषिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. हीच परिस्थिती महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात सर्रास बघायला मिळते. त्यामुळे भाषेवरुन होणारे वाद- विवाद आता एआयच्या (AI) मदतीने दूर केले जाऊ शकतात.
View this post on Instagram
























