Yashashri Munde : मोठी बातमी! आधी गाजावाजा, पण मुंडेंच्या लेकीची निवडणुकीतून माघार; अखेर यशश्री मुंडेंचा अर्ज मागे
Yashashri Munde : भाजपचे दिवगंत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

Yashashri Munde : भाजपचे दिवगंत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे (Yashshri Munde) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. येत्या 10 ऑगस्टला वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक (Vaidyanath Bank Election) प्रक्रिया पार पडणार आहे. याच निवडणुकीसाठी यशश्री मुंडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता यशश्री मुंडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वैद्यनाथ बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून खेळीमेळीच्या वातावरणात होत असलेल्या निवडणुकीतून यशश्री मुंडे यांनी माघार घेतली आहे. तत्कालीन संचालक मंडळाने माजी खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतलाय. दोन महिलांमध्ये प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. उद्या अंतिम यादी जाहीर होणार असून 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी 12 रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, यशस्वी मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले होते. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे. यापूर्वी त्यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याचे कामकाज देखील पाहिले होते. मात्र संचालक मंडळाच्या निर्णयानुसार त्यांनी माघार घेतल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत यशश्री मुंडे?
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि पंकजा, प्रीतम मुंडे यांची बहीण यशश्री मुंडे या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडन्ट म्हणून गौरवही करण्यात आला. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. तर यशश्री यांनी शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे. आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जामुळे यशश्री मुंडे चर्चेत आल्या होत्या. मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























