Suresh Dhas on Walmik Karad : 'पंकजाताईंनी दसऱ्याला आकांची ओळख सांगितली...', सुरेश धस यांचा नेमका इशारा कोणाकडे?
Suresh Dhas on Walmik Karad : मी त्याच अजून नाव घेतलेला नाही परंतु फक्त आका म्हणलं आहे. विष्णू चाटे अँड गॅंगचा आका म्हणलेला आहे. हा आका इन्वेस्टीगेशनमध्ये पुढे आला तर आका आपोआपच बिन भाड्याच्या खोलीमध्ये जातील, असंही पुढे सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
नागपूर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे (Beed Massajog Sarpanch) पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल(शुक्रवारी) या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल त्याचबरोबर या प्रकरणाची पाळंमुळं शोधली जातील असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. दरम्यान आज या प्रकरणावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणालेत सुरेश धस?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड यांच्या संदर्भामध्ये विरोधक नाना पटोले, अंबादास दानवे यांनी अटकेची मागणी केली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. वाल्मीक कराड यांचा जर संबंध असेल तर त्यांना अटक होणार आहे. विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये चर्चा सुरू आहे की, वाल्मीक कराड यांना अटक कधी होणार या प्रश्नावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, या सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे जे काल बोललेले आहेत त्याच्या पुढचं वाक्य मी वापरू शकत नाही. काल या ठिकाणी एसआयटीच्या स्थापनेची घोषणा झालेली आहे. यासाठीची स्थापना करत असताना सुद्धा गृह विभाग त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी ऑर्डर निघेल, ऑर्डर निघाल्यानंतर जे आपण नाव घेतलेला आहे. मी त्याच अजून नाव घेतलेला नाही परंतु फक्त आका म्हणलं आहे. विष्णू चाटे अँड गॅंगचा आका म्हणलेला आहे. हा आका इन्वेस्टीगेशनमध्ये पुढे आला तर आका आपोआपच बिन भाड्याच्या खोलीमध्ये जातील, असंही पुढे सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांचा वरदहस्त होता असं म्हटलं होतं. मुंडे कालपर्यंत सभागृहात उपस्थित नव्हते आज मात्र त्यांनी हजेरी लावली, काल त्यांचं नाव घेण्यात आलेलं नाही असं आव्हाडांचं म्हणणं होतं, त्यावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, 'ते मला माहिती नाही. परंतु ते स्वतः माध्यमांच्या समोर काय बोलले ते त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आहे त्यांची ओळख काय आहे ते आधीच सांगितलेले आहे. आका यांची ओळख मी नाही पंकजा ताईंनी सांगितली आहे, आणि भगवान भक्ती गडावरती त्यांनी सांगितलेले आहे', असं धस म्हणाले, त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी त्यावेळी बोलताना म्हणलेलं धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही असे वाल्मीक कराड आहेत. तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यावर पत्रकारांनी तुमचा निशाणा धनंजय मुंडे यांच्याकडे आहे का? असा प्रश्न केल्यानंतर सुरेश धस म्हणाले, माझा इशारा तिकडे नाही पण त्यांचं पान हालत नाही परंतु या प्रकरणांमध्ये ते असतील असं मला वाटत नाही. हे आका जे आहेत, ते आका यामध्ये असतील. हे मात्र शंभर टक्के खरं आहे, असं सुरेश धस म्हणाले आहेत.
मात्र, संतोष देशमुख प्रकरणांमध्ये मला वाटत नाही. त्यांनी काही ऑर्डर सोडले असेल असं नाही, पण जर त्यांनी काही ऑर्डर सोडले असेल तर आकाच्या बरोबर आकाचे आका सुद्धा जेलमध्ये जातील. आता आका, किंवा बाकी आता कोणी शिल्लक राहणार नाही लवकरच त्यांना अटक होईल असेही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांबाबत मोठा दावा
बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्था, ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन आणि माजलगाव या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपये ठेवीदारांच्या अडकलेले आहेत. हे सगळे मल्टीस्टेटचे मालक आहेत. ते सर्व जेलमध्ये आहेत. परंतु मराठवाड्यातील 16 लाख ठेवीदार आहेत. बीड जिल्ह्यातील एक लाख 26 हजार ठेवीदार आहेत. वेळेवर औषध उपचाराला पैसे न मिळाल्यामुळे 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बीड जिल्ह्यातल्या भीमाशंकर वाडेकर या तरुणाने पैसे मिळत नसल्यामुळे धरणांमध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. 5500 कोटी ठेवी पैकी 3700 कोटी रुपये हे एकट्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकले आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट सुरेश कुटे नावाचा व्यक्तीची आहे, त्याच्या पत्नीच्या सुरक्षेसाठी 36 लोक बॉडीगार्ड म्हणून फिरत होते, मला अजून माझ्या आयुष्यात एकही बॉडीगार्ड मिळालेला नाही. परंतु याच्या पत्नीला छत्तीस बॉडीगार्ड असायचे. प्रचंड प्रमाणात संपत्तीचं वाटोळ या लोकांनी केलं आहे, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली होती. सचिन उबाळे याने चांगल्या प्रकारचे आंदोलन उभा केले आहे. कारण राज्य सरकारच्या रजिस्ट्रेशन आहे, इतक्या नावावर थांबता येणार नाही. या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जाऊन या पाच हजार पाचशे कोटी रुपयांच्या ठेवी या लोकांना मिळाल्या पाहिजे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक लावण्याचा आश्वासन मला दिलेले आहे. आम्ही बैठक लावून घेऊ आणि या लोकांच्या वरती फक्त 420 आणि इतर कलमांच्या ऐवजी या सर्वांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या पाहिजेत. त्याची विक्री केली पाहिजे आणि संघटित गुन्हेगारीमधील हा सर्वात मोठा प्रकार आहे, म्हणून त्यांच्यावरती साधे कलम न लावता त्यांच्यावरती मोका लावण्यात यावा अशा प्रकारच्या मागणी मी करणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना सुरेश धस यांनी माध्यमांना दिली आहे.