Satish Bhosale : 'अण्णा तुम्ही कुठल्याही पक्षात जा अन् मुख्यमंत्री व्हा...', फरार सतीश भोसले उर्फ खोक्याभाईचा Video व्हायरल
Satish Bhosale Viral Video : खोक्याभाई सुरेश अण्णा धस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपेक्षा व्यक्त करत असलेल्या एका भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानं खोक्याभाईची चर्चा होऊ लागली आहे.

Satish Bhosale : बीडमधील भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईचे एकापाठोपाठ एक कारनामे पुढे येत आहे. बॅटने अमानुष मारहाण तसेच शिकारीत आडवे येणाऱ्या ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण केल्याच्या प्रकरणात फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याभाई तिसऱ्या दिवशीही पोलिसांना सापडलेला नाही. अशातच बीडच्या सतीश भोसलेचा (Satish Bhosale) आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. आता खोक्याभाई सुरेश अण्णा धस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपेक्षा व्यक्त करत असलेल्या एका भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानं खोक्याभाईची चर्चा होऊ लागली आहे.
भविष्यात अण्णा मुख्यमंत्री व्हावेत
व्हायरल व्हिडीओच्या क्लीपमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याभाई अण्णा आता आमदार आहेत. भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. अण्णा कोणत्याही पक्षातून मुख्यमंत्री व्हावेत, काही घेणं देणं नाही. आपण अण्णाप्रेमीच राहणार. आज मी भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे, तरीही अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असणार आणि आपण अण्णासोबत असणार, असं सतीश भोसले उर्फ खोक्या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
सुरेश अण्णा धस भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत - खोक्याभाईचा नवा व्हिडीओ व्हायरल#sureshdhas #SatishBhosale pic.twitter.com/ViY0idwU7K
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) March 8, 2025
हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिरूर परिसरातील वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी म्हटले आहे की, आमच्या परिसरात प्रचंड प्रमाणात हरणांचा वावर आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर आणि ससा यांची संख्या कमी झाली आहे. दिवसाढवळ्या हरणाची शिकार केली जात आहे. परिसरात शेकडा हरणांचा वावर असताना ही हरणं कुठे गेली? ती हरणं यांच्या पोटात गेले की काय? असा माझा संशय आहे. सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी हरणांची तस्करी करून त्याचा पैसा जमा करत असल्याने कदाचित त्यांच्याकडे सोनं, आलिशान गाड्या असू शकतात, अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरेश धस म्हणतात की, ऐ खोक्या, हॅलो....अरे सॉरी हा बाबा.... मला गडबडीत शुभेच्छा द्यायला जमलं नाही. यानंतर सतीश भोसले म्हणतो, बोला ना... सुरेश धस पुढे म्हणतात काय नाही काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा.... यावर सतीश भोसले म्हणतो, धन्यवाद भाऊ... तुमचा आशीर्वाद राहुद्या फक्त पाठिशी. यावर सुरेश धस म्हणतात, 100 टक्के आहे... 100 टक्के... 99 सुद्धा नाही, असे दोघांमधील संभाषण आता व्हायरल झाले आहे. सतीश भोसलेला सुरेश धस यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सतीश भोसले याची चर्चा होत आहे.



















