धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
Uday Samant on Ravindra Dhangekar: जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले असून संबंधित जागेच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Uday Samant on Ravindra Dhangekar: “रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे.” तसेच, “धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे,” असे म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष वनमंत्री गणेश नाईकांवर तोफ डागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेलक्या शब्दात गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाई केली जाणार अशी चर्चा सुरु झाली होती, त्याला एक प्रकारे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला आहे का? असाही सवाल केला जात आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले असून संबंधित जागेच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी ट्विटबाॅम्ब दररोज फोडत असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे म्हटल
युतीचे निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे
उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर प्रकरण, महायुतीतील ऐक्य, तसेच विविध राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी सांगितले की, महायुतीच्या संदर्भात बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावण्यात आला आहे. “आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांना त्रास होणार नाही, पण स्थानिक पातळीवर कुणी जास्त ‘खुमी’ दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, “महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील. युतीचे निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना मात्र बाजूला केले पाहिजे.”
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे दिवास्वप्न
बालनाट्य परिषदेवरील आरोपांबाबत सामंत म्हणाले, “हा पूर्णपणे बालनाट्य परिषदेचा विषय आहे, आणि ज्यांनी आरोप केले त्यांनीच आता खुलासा केला आहे.” संजय राऊत यांच्या राहुल गांधी पंतप्रधान वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना त्यांनी प्रहार केला. “राहुल गांधी पंतप्रधान होणार हे दिवास्वप्न आहे. राहुल गांधी पंतप्रधान होतील असं म्हणणं म्हणजे मी ट्रम्प झालो, असंच आहे,” अशी खोचक टीका त्यांनी केली. दरम्यान, एमसीए निवडणुकीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी क्रिकेट खेळलो आहे, आता कबड्डीही खेळायची आहे, तसं अजित पवारांना सांगावं लागेल. शरद पवार यांचं योगदान मोठं आहे,” असं उदय सामंत म्हणाले.























