Beed : जातीयवाद कोण करतंय? नामदेवशास्त्रींचे वक्तव्य आणि देशमुख कुटुंबीयांची भगवानगडावर भेट
Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri : राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थन आणि त्याचवेळी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता तपासण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य, त्यामुळे नामदेवशास्त्रींवर टीका होत आहे.

बीड : नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर, संतोष देशमुखांचं कुटुंब भगवान गडावर दाखल झालं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधातले पुरावे त्यांनी नामदेवशास्त्रींना सादर केले. नामदेवशास्त्रींनी आमची बाजू समजून घ्यायला हवी होती, अशी भूमिका वैभवी देशमुख यांनी मांडली. तर देशमुख कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादाचं लेबल लावू नका असं आवाहन धनंजय देशमुखांनी केलं.
देशमुख कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी म्हणणं चुकीचं आहे अशी भूमिका संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्यासमक्ष सर्वांसमोर मांडली. नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं नवा वाद उफाळला आहे. असं असतानाच रविवारी देशमुख कुटुंबियांनी भगवानगड गाठला.
नामदेवशास्त्रींची देशमुख कुटुंबीयांना ग्वाही
देशमुख कुटुंबानं कधीच जातीयवाद केला नाही, उलट दलित बांधवाला वाचवताना संतोष देशमुखांना प्राण गमवावे लागले असं मत धनंजय देशमुख यांनी नामदेवशास्त्रींशी संवाद साधताना मांडलं. भगवानगडाचा देशमुख कुटुंबाला पाठिंबा आहे आणि आरोपींना कधीच पाठिशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही नामदेवशास्त्रींनी दिली.
नामदेवशास्त्रींचे वादग्रस्त वक्तव्य
नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंवर प्रतिक्रिया दिल्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली. धनंजय मुंडे संत झाले असते... खून करणाऱ्याची मानसिकता तपासली पाहिजे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा नाही अशा प्रकारचे वक्तव्य नामदेवशास्त्रींनी केली.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे सर्वांच्या टीकेचे धनी झालेत. त्याला अपवाद फक्त भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री. धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या, मारेकऱ्यांची मानसिकता तशी का झाली याचा शोध घेण्याचा सल्ला देणाऱ्या नामदेवशास्त्रींना भेटण्यासाठी संतोष देशमुखांच्या कुटुंबानं भगवानगड गाठला. सुरुवातीला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची पार्श्वभूमी अधोरेखित करणारे पुरावे सादर केले.
देशमुख कुटुंबानं कधीत जातीयवाद केला नाही हे स्पष्ट करताना, त्यांची जमीन कसणारे मुंडे आणि देशमुखांचे कसे ऋणानुबंध आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुखांचं म्हणणं सविस्तर ऐकल्यानंतर, आरोपींना माफी मिळणार नाही अशी ग्वाही नामदेवशास्त्रींनी दिली.
संतोष देशमुख कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना काहींनी जातीयवादाचं लेबल लावलं. तसंच धनंजय मुंडेंनी देखील विशिष्ट समाजावर अन्याय होत असल्याची भावना, बोलून दाखवली होती. हाच मुद्दा नामदेवशास्त्रींसमक्ष धनंजय देशमुखांनी उपस्थित केला. तर वैभवी देशमुखनं देखील हाच मुद्दा अधिक प्रकर्षाने पुढे नेला.
धनंजय मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या नामदेवशास्त्रींवर टीका होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 पेक्षा अधिक दिवस लोटलेत. वाल्मिक कराडवर झालेले गंभीर आरोप, वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर झालेली टीका, त्यानंतर वाल्मिक कराडची नाट्यमय शरणागती, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढलेला दबाव आणि त्यानंतर नामदेव शास्त्रींनी केलेली धनंजय मुंडेंची पाठराखण. ही वेगवेगळी वळणं घेतल्यानंतर हे प्रकरण आता जातीयवादाच्या मुद्द्यावर येऊन ठेपलंय.
ही बातमी वाचा:
























