Santosh Deshmukh Case: 'आश्वासनावर विश्वास ठेवला मात्र...', संतोष देशमुखांच्या भावाने व्यक्त केल्या संतप्त भावना; म्हणाले, 'कुटुंब पूर्ण पोरकं केलं...'
Santosh Deshmukh Case: ज्या पद्धतीने आमच्या भावाला संपवलं, कुटुंब पूर्ण पोरकं केलं आहे, कुटुंबाला न्याय द्या आणि आरोपींना फाशी द्या एवढीचं अपेक्षा आहे, अशी भावना मृत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येला आज 19 दिवस पुर्ण झाले. मात्र, या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने देशमुख कुटूंबाने आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, आज ( शनिवारी 28 डिसेंबर) या घटनेविरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. दरम्यान या मूक मोर्चासाठी अनेक नेते हजेरी लावणार आहेत. आरोपीला अटक करा, ही एकाच मागणी आमची आहे, आमच्या दुसऱ्या कुठल्याच वेदना आम्ही मांडत नाही. ज्या पद्धतीने आमच्या भावाला संपवलं, कुटुंब पूर्ण पोरकं केलं आहे, कुटुंबाला न्याय द्या आणि आरोपींना फाशी द्या एवढीचं अपेक्षा आहे, अशी भावना मृत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणालेत धनंजय देशमुख?
समाजातील विकृतीनी माझ्या भावाचा घात केला आहे, समाज पूर्ण आमच्या पाठीशी आहे. माझा भाऊ समाजाच्या, गावाकऱ्यांच्या मनाचा राजा होता, प्रत्येक जाती धर्मासोबत होता. सुरु असलेल्या तपासावर आम्ही समाधानी नाही, आम्ही यंत्रनेवर विश्वास ठेवला पण अजून आरोपी अटक नाही. त्यांनी सांगावं अजून अटक का नाही? नेमकं कोणाचं अभय आरोपींना आहे. अटक करणे ही सर्वात प्राथमिक गोष्ट आहे, पण अजून आरोपी अटक नाहीत. त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्य आज बीडच्या मोर्चात सहभागी होतील, आईची तब्येत व्यवस्थित नाही त्यामुळे तीला सोबत घेणार नाही. कुटुंब अजूनही या धक्यातून सावरलेलं नाही, गावचा कुटुंब प्रमुख होता, घरची अवस्था काय असेल याचा विचार करा. आम्हाला सर्वांनी आधार दिला आहे पण घरात बसल्यानंतर तुटल्यासारखे वाटतं, एकमेकांकडे बघतो, यातून सावरणे कठीण आहे. माझा भाऊ कोणी परत आणू शकत नाही, पण जो अन्याय झाला आहे, किमान त्याबाबतीत न्याय तरी द्यावा हे सोडून काय मागावं? असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
माझ्या भावाने गावातलं प्रत्येक मन जिंकलं होतं, ते सर्वांच्या मनावर राज्य करत होते, म्हणून लोक आमच्या राजाला न्याय द्या म्हणत आहेत, आम्ही दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवला मात्र, आम्ही त्याबाबत समाधानी नाही, आम्हाला त्यांनी तपासाची माहिती दिली पाहिजे. मात्र, अद्याप मुख्य सूत्रधारांना अटक केलेली नाही, त्यांना अटक करावी आणि शिक्षा द्यावी इतकीच आमची मागणी आहे, प्रशासनावर कोणाचा दबाव आहे ते त्यांनी सांगावं, आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे, असं मृत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा. यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार आहेत.
खासदार बजरंग सोनवणे,
आमदार संदीप क्षीरसागर,
आमदार प्रकाश सोळंके,
आमदार सुरेश धस,
आमदार जितेंद्र आव्हाड,
अंजली दमानिया,
मनोज जरांगे पाटील,
छत्रपती संभाजी राजे भोसले, आदी नेते आणि नागरिक या ठिकाणी हजेरी लावणार आहे.