Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
Santosh Deshmukh Beed Morcha :संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली.
Manoj Jarange Patil : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील हजेरी लावली. या मोर्चात मनोज जरांगे हे गर्दीत बसल्याने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
मोर्चातील सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे गर्दीत खाली बसले होते. तर सर्वपक्षीय आमदार आणि खासदार स्टेजवर होते. मनोज जरांगे पाटील हे खाली बसलेले दिसताच स्टेजवरील नेत्यांनी त्यांना स्टेजवर येण्याचा आग्रह धरला. प्रचंड गर्दीतून वाट काढत मनोज जरांगे स्टेजवर पोहोचले. यानंतर मनोज जरांगे हे स्टेजवर खाली बसले होते. मात्र, छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस यांच्यासह आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगे यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर मनोज जरांगे खुर्चीवर बसल्याचे दिसून आले.
मनोज जरांगेंचा हल्लाबोल
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संतोष देशमुख प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही. कुणाच्या पण बापाला येऊ द्या. मॅटर मात्र मी दबु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणात राजकारण करू नये, मग महायुती किंवा महविकास आघाडी असो, कुणीही राजकारण करू नये. लाजा वाटू द्या. तुमच्या दोघांमुळेच हाल होऊ लागले आहे. काही मंत्री आहेत, काही विरोधी पक्षातले आहेत. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवरती आरोप करणे बंद करा. संतोष भैय्याचा खून झाला आहे, याचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनी करू नये. गृहमंत्र्यांनी यात हलगर्जीपणा करू नये. आरोपींना लवकर सापडून आणा, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. तर आरोपी 24 -24 तासात सापडत असतो. तुम्हाला 19 दिवस सापडत नाही याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. आरोपींना सांभाळण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या