Beed Crime : बीडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट पोलीस अधीक्षक पथकावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल
Sand Mafia Attack On Beed Police : पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
![Beed Crime : बीडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट पोलीस अधीक्षक पथकावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल Sand mafia attack on Superintendent Police team in Beed case has been registered against Sand mafia Beed Crime : बीडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट पोलीस अधीक्षक पथकावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/87a3e7b92ffd4cef42cd98996ba1b0f31691591297434290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड: जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवैधरीत्या सुरु असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी (Sand Mafia) हा जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये गणेश मुंडे आणि इतर एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे वाळू माफियांचा मुजोरपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मागील काही दिवसांत बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पाहायला मिळत आहे. लिलाव झालेला नसतानाही गोदावरीच्या पट्यात रोज हजारो ब्रास अवैधरीत्या वाळू उपसा करण्यात येत आहे. दरम्यान, आता या वाळू माफियांची एवढी हिम्मत वाढली आहे की, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरच थेट हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश मुंडे आणि विष्णू वायबसे हे दोघे गोदावरी पात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी जात होते. यावेळी, राक्षस भवन फाट्यावर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे, आपल्या गाडीतून उतरून त्यांनी स्कॉर्पिओच्या चालकाला विचारपूस केली असता, चालकाने थेट गणेश मुंडे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली असून, विष्णू वायबसे हे देखील जखमी झाले आहेत. या दोघांवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत.
वाळूमाफियांच्या विरोधात धडक कारवाई
या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी अतुल मस्के आणि राम मोरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी वाळूमाफियांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
गोदावरी पट्यात बेसुमार वाळू उपसा...
गेल्यावर्षी जायकवाडी धरण भरल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. यामुळे गोदावरी नदीत वाळू साठा देखील वाढला आहे. याचाच फायदा घेत मागील काही दिवसांपासून गोदावरी पट्यात अवैधरीत्या वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो ब्रास वाळूचा उपसा झाला आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाला कारवाईचा अधिकार असतांना देखील अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, यामुळे सरकारचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)