Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडेंचा खून कोणी केला? वाल्मिक कराडच्या मुलावर काय आरोप?
Mahadev Munde Murder Case : परळीतील पिग्मी एजंट असलेल्या महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं जात आहे.
बीड : परळीमध्ये भर तहसीलच्या समोर संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान एक खून होतो. या घटनेला पंधरा महिने उलटतात तरीही खुनाचा उलगडा होत नाही. यादरम्यान चार तपास अधिकारी बदलतात, दोन एसपीची बदली होते. आपल्या पतीला न्याय मिळवा म्हूणन पत्नी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवते. पण आरोपी मिळत नाहीत. आपण बोलतोय ते महादेव मुंडे खून प्रकरणाबद्दल. हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात,
महादेव दत्तात्रेय मुंडे या पिग्मी एजंट, दूध व्यवसायिकाचा 21 ऑक्टोबर 2023 च्या रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत गळ्यावर, चेहऱ्यावर हातावर धारदार शस्त्राने वार करून हत्या होते. या घटनेला आज दीड वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही महादेव यांचा खून कोणी केला आणि का केला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे.
पत्नीने पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले
पोलिसांनी परळी शहर पोलिस ठाण्यात या सगळ्या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला. पण आरोपी कोण हे काही निष्पन्न होत नव्हते. दोन अडीच महिने वाट पाहिल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले, मेहूणा सतीश फड यांनी तत्कालीन एसपींकडे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक , पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केले. मात्र न्याय मिळाला नाही.
सुरेश धसांनी प्रकरण उजेडात आणलं
पुढे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलीस तपासात कोणाचा दबाव होता, आरोपी बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला असं सांगत वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला महादेव मुंडेंचे खुनाचे आरोपी फिरत असल्याचा दावा केला. सुरेश धसांनी हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं. याच प्रकरणात आमदार धस यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि हा तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची विनंती केली.
पोलिसांनी आरोपींचा तपास केलाच नाही
यातील धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील सायबर तज्ज्ञांनी या सगळ्या प्रकरणात डाटा वेगळा करून 150 मोबाईल काढले, त्यातून सहा मोबाईल क्रमांक काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही असा आरोप धस यांनी केला. शिवाय तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाईल डाटा तपासल्याची विनंती केली आहे.
वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप
त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील धस यांनी आरोप केला आहे. याबरोबरच जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घटनास्थळावरून मयताची मोटरसायकल, मयताची चप्पल, मारेकऱ्याची चप्पल मारेकराचा काळ्या रंगाचा हात रुमाल जप्त करण्यात आला. मग तिथून बाजूलाच असलेला मयत महादेव मुंडेचा मृत्यू पोलिसांना का दिसला नाही हा प्रश्न उपस्थित केला. निदान आता तरी नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक नवनीत कावत हे महादेव मुंडे यांच्या खुन्याला जेर बंद करतील हीच अपेक्षा.
ही बातमी वाचा: