Manoj Jarange : निष्पाप मुलांना फसवू नका, उद्यापासून 'ती' कारवाई बंद करा; जरांगे थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकले
Manoj Jarange : आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निष्पाप मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे विनंती केली आहे.
बीड : जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीनंतर पोलिसांनी अनेकांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या आणि निष्पाप मुलांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान, आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निष्पाप मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे विनंती केली आहे. तसेच उद्यापासून निष्पाप लोकांना अडकवण्याची कारवाई बंद करण्यात यावी असेही जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्या भेटीनंतर जरांगे म्हणाले की, "बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीत सहभागी नसलेल्या आणि ज्यांचा कोणताही या घटनेशी संबध नसतांना त्यांना अटक केली जात आहे. तसेच सरसकट त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 307 नुसार गुन्हे दाखल केले जात आहे. काही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर देखील पुन्हा त्यांना पोलीस कोठडीत टाकले जात आहे. त्यामुळे आज बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा त्यांच्याकडे विनंती केली आहे. ज्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे त्यांच्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र, ज्यांचा सहभाग नाही अशा तरुणांना विनाकारण त्रास का दिला जात आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
उद्यापासून त्रास देणं बंद करा...
बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन तीन याद्या तयार केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे तर सर्व बीड जिल्ह्यातील लोकांना गुंतवल्या सारखं होईल. तर, ज्यांच्या या घटनेशी काहीही संबध नाही अशा गोरगरीब मुलांवर अन्याय होऊ नयेत अशी आम्ही पोलिसांकडे विनंती केली आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील सर्वच सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते. ज्यांचा या प्रकरणात सहभाग आहे त्यांच्याबद्दल आमचं काहीच मत नाही. पण ज्यांचा सहभागच नाही त्यांना उद्यापासून कोणताही त्रास होऊ नयेत अशी आमची मागणी असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
. काही अधिकारी विनाकारण मुलांना त्रास देतायत...
बीडमधील जाळपोळ प्रकरणात ज्यांचा कोणताही संबध नाही अशा लोकांना पोलीस आतमध्ये कसे ठेवू शकतात, किंवा त्यांचे नावं अज्ञातमध्ये घेऊन त्यांची चौकशी करू शकतात. काही अधिकारी विनाकारण मुलांना त्रास देत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांची वेदना आहे, म्हणजेच त्यांनी काही पाप केले नाही. ज्यांनी राडा केला त्यांच्याबद्दल मराठा समाजाचे कोणतेही मत नाही. पण जे नाहीत त्यांच्याबद्दल आमचे मत असणारच आहे. संबध नसतांना त्यांच्यावर तुम्ही अन्याय कसे करू शकतात. त्यामुळे असा अन्याय होणार नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले असल्याचे जरांगे म्हणाले.
सर्वांवर 307 नुसार सरसकट कसे गुन्हे दाखल करतात?
ओबीसी नेत्यांच्या दबावाशिवाय असे खोटे गुन्हे दाखल केले जाणारच नाही. पोलिसांनी विनाकारण एवढ्या मोठ्या प्रमाणात नावं घेतलेच नाही, पण आता त्यांना हे नावं देण्यात आले आहे. पण आपल्यावर दबाव असल्याचे आता पोलीस काही सांगणार नाही. पण यात आमचे लेकरं विनाकारण अडकत आहे. आंदोलनात फक्त उभा राहिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वांवर 307 नुसार सरसकट कसे गुन्हे दाखल करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार; पहिल्याच दिवशी मनोज जरांगेंचा एल्गार