Manoj Jarange : वेगळं आरक्षण घेणं म्हणजेच मराठ्यांची फसवणूक; जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर
Manoj Jarange Patil : आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेण्यासाठी ठाम असून, जर वेगळं आरक्षण मागितलं तर मराठा समाजाची ही फसवणूक होईल.
बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ, मात्र जरांगे यांनी ओबीसीतून (OBC) आरक्षण न घेता आपलं आरक्षणाचे वेगळे ताट घ्यावं असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रविवारी नांदेड (Nanded) मधील ओबीसी मेळाव्यात केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्या याच वक्तव्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे."आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेण्यासाठी ठाम असून, जर वेगळं आरक्षण मागितलं तर मराठा समाजाची ही फसवणूक होईल. त्यामुळे आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहे.
मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा वाद पाहायला मिळतोय. या वादात अजित पवारांनी मात्र मौन बाळगले होते. सोबतच छगन भुजबळ यांना शांत राहण्याच्या सूचना देखील दिल्याची देखील चर्चा होती. मात्र असे असतानाच रविवारी अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून अजित पवार विरुद्ध जरांगे असा सामना पाहायला मिळतोय. यावरुनच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मराठ्याच्या अंगावर घातलं. त्यामुळे अजित पवारांना मराठा समाजावर किती प्रेम आहे हे समाजाला माहित आहे,असे जरांगे म्हणाले आहेत.
मुंबई आंदोलनाच्या नावाने पैसे जमा करू नका
मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या नावावरती काही लोक पैसा जमा करत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोणीही समाज बांधवांकडून पैसे घेऊ नये आणि जर घेतले असतील तर ते परत करावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर येथील मनोज जरांगे यांची सभा संपल्यानंतर काही लोकांनी याबाबत त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर घेऊन मुंबई आंदोलनाच्या नावावर कोणीही पैसे जमा करू नये असे आवाहन केले आहे. तर, गाव खेड्यातले लोकं एक एक रुपया जमा करून कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. गावागावात आपल्या लोकसहभागातून पैसे जमा करून मुंबईचा आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून आंदोलनाच्या नावावर पैसे घेऊ नयेत आणि पैसे देणाऱ्यांनीही आंदोलनाच्या नावावर कोणालाही पैसे देऊ नयेत असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार आहेत. याच मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा करत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गावागावात मनोज जरांगे यांचे उत्साहात स्वागत करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच मुंबई आंदोलनात आपण देखील सहभागी होणार असल्याचं गावकरी जरांगे यांना सांगत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही, सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम