आपल्या भावाला न्याय द्यायचा, लेकीने हाक दिलीये; संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर मनोज जरागेंचा निर्धार
Manoj Jarange Patil, बीड : न्याय मागण्यासाठी 28 तारखेला मोर्चा निघणार, सर्वांनी सहभागी व्हा, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.
Manoj Jarange Patil, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्धार केलाय. जरांगे पाटील यांनी आज (दि.25) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आपल्या भावाला न्याय द्यायचा, लेकीने हाक दिलीये. न्याय मागण्यासाठी 28 तारखेला मोर्चा निघणार आहे.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी 28 तारखेला मोर्चा निघणार आहे. आणि या मोर्चात एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. तर या मोर्चात कोणीही राजकारण आणू नये असे माझे मत असून एका लेकीने आपल्या वडिलांसाठी हाक दिली. कुणाला आमंत्रण असो वा नसो कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आमंत्रण नाही असं म्हणून नये. लेकीने हाक मारली म्हणून सहभागी व्हायचं असल्याचं पाटील यांनी मस्साजोग गावातून म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, या घटनेने सर्व महाराष्ट्र हळहळला आहे. अशी घटना राज्यभरात कधी झालेली नाही. जिल्हाभरातील लोकांना सांगतो 28 तारखेला मोर्चा निघतोय मुलीने हाक मारली आहे त्यासाठी मोर्चाला या...समोर कोण आहे हे डोक्यात ठेवू नका. तुम्हाला तुमचे पक्ष यात आणू नका. कुणात कुजबुज असेल तर ती सोडून द्या. 28 तारखेच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपली जबाबदारी संतोष भैय्याला न्याय द्यायची. नाही घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. 50 मंत्री होऊ द्या मागे हटणार नाही. पूर्ण जीव पणाला लावणार पण न्याय घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांना सांगतो या समाजाचा विश्वास तुमच्यावर ढळलेला नाही. तुमच्या सरकार मध्ये आहे म्हणून सोडू नका. तपास जनतेने हातात घेतला तर अवघड होईल ही धमकी नाही. मुख्यमंत्री साहेबांवर आशा आहे त्याला विलंब लावू नका. पोलीस यंत्रणेला पंधरा दिवस लागत असतील तर मग शंका येत आहे.
सर्व मागण्या तातडीने मान्य करा. आता पालकत्व तुमच्याकडे आहे. तपासात कसूर करू नका दगा फटका करू नका. कठोर तपास करा आणि यांना आत टाका. यातील आरोपी एवढे मोठे नाही. हे मुख्यमंत्र्यांना न शोभणार आहे. आम्हाला आशा आहे मुख्यमंत्री आम्हाला शंभर टक्के न्याय देतील. या समाजाला या गावाला आणि राज्याला न्याय पाहिजे. नाहीतर आम्हाला नाही घ्यावा लागेल. तातडीने जे ठरवायचं ते ठरवा पण तातडीने हे डांबा कुणालाही ठेवू नका, असंही जरांगे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम अन् मंत्रिमंडळातून बाहेर, अजितदादांनी 16 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला?