भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम अन् मंत्रिमंडळातून बाहेर, अजितदादांनी 16 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला?
NCP Conflict : अजित पवार ज्यावेळी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांना छगन भुजबळांशी पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला होता. आता 16 वर्षांपूर्वीचा हिशोब अजितदादांनी चुकता केल्याची चर्चा आहे.
मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी व्यक्त केलेली खदखद अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. त्यानंतर चर्चा झाली ती भुजबळांना अजितदादांनी मुद्दामहून डावलल्याची. पण अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये याआधीपासून एक सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जातं. तो संघर्ष होता उपमुख्यमंत्रीपदावरुनचा. त्या संघर्षामुळे भुजबळांना आता मंत्रीपद मिळालं नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
साल 1999... शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका पार पडल्या. काँग्रेससोबत नव्यानं निर्माण झालेली राष्ट्रवादीही सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाली. महत्त्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळांना थेट उपमुख्यमंत्रीपदावर बसवलं. भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले.
तेलगी घोटाळ्यात भुजबळांचा राजीनामा
भुजबळांची ही पहिली इनिंग सव्वा चार वर्षे चालली . पण तेलगी स्टँप घोटाळ्यात भुजबळांचं नाव आलं आणि 23 डिसेंबर 2003 ला भुजबळांना राजीनामा द्यावा लागला . त्यानंतर एक वर्ष विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यानंतर पुढची चार वर्ष आर आर पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनले.
संधी चालून आली, पण भुजबळांची बाजी
याच मंत्रिमंडळात शरद पवारांचे पुतणे अजित पवारही होते. अजितदादांच्या राजकीय महत्वाकांक्षांना या काळात धुमारे फुटू लागले होते. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे दोन दशकांपूर्वीत भुजबळ आणि अजित पवारांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. या दोघांसाठीही उपमुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली ती 26/11 च्या हल्ल्यानंतर.
मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत शरद पवारांनी आर आर पाटलांचा गृहमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला. दशमुखांच्या जागी काँग्रेस हायकमांडने अशोक चव्हाणांना संधी दिली तर तिकडे राष्ट्रवादीत भुजबळ आणि अजित पवारांमध्ये उपमुख्यमंत्री बनण्यासाठी संघर्ष सुरु झालं.
सन 2008 च्या त्या संघर्षात अनुभवी छगन भुजबळ वरचढ ठरले आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले. त्यामुळं नाराज झालेले अजित पवार पुढचे काही दिवस नॉट रिचेबल झाले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवारांना पुन्हा एकदा चरफडत बसावं लागलं . मात्र आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला आणि ती संधी साधत अजित पवारांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरु केल्या . उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेण्यासाठी त्यांनी पक्षात दबाव तंत्राचा वापर सुरू केला.
अजितदादांचे दबावतंत्र यशस्वी
अजित पवारांचे विश्वासू विलास लांडेंनी पक्षाच्या आमदारांच्या सह्यांची मोहीम सुरु केली. बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या नावासमोर साह्या केल्या. त्यामुळे भुजबळांना बाजूला करुन अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय शरद पवारांसमोर पर्याय राहिला नाही.
11 नोव्हेंबर 2010 रोजी, पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री बनलेत. मात्र आता राष्ट्रवादीची कमान ही अजित पवारांकडेच असल्यानं अनुभवी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. अजित दादांनी करेक्ट कार्यक्रम करत 16 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला अशी चर्चा आहे.
छगन भुजबळ असतील काय , वळसे पाटील असतील काय किंवा प्रफुल्ल पटेल... राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवारांचं या नेत्यांसोबत कधीच पटलं नाही. संधी मिळताच अजित पवारांनी भुजबळ आणि वळसे पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून जुना हिशोब चुकता केल्याचं बोललं जातंय.