Beed News: काय सांगता! बंदोबस्ताला आले अन् कुस्ती गाजवून गेले
Beed News: कुस्त्याच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने बंदोबस्तसाठी आलेल्या एका जमादाराने लातूरच्या मल्लाला अस्मान दाखवून विजेतेपद पटकावले.
Beed News: सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यात्रा आणि उरूस भरवले जात आहे. त्यामुळे यानिमित्ताने गावात कुस्त्यांचे आखाडे देखील भरत आहे. तर राज्यात काही गावातील कुस्त्यांची एक आगळीवेगळी ओळख असल्याने या आखाड्यांची आणि कुस्त्यांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र अशात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र जातेगाव येथील यात्रोत्सवात भरवण्यात आलेल्या कुस्त्यांची एका वेगळ्याच कारणाने चर्चा होत आहे. कारण कुस्त्याच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने बंदोबस्तसाठी आलेल्या एका जमादाराने लातूरच्या मल्लाला अस्मान दाखवून विजेतेपद पटकावले. हरिभाऊ बांगर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बांगर हे तलवाडा पोलीस ठाण्यात ठाण्याचे अंमलदार असून, जातेगावचे बीट जमादार आहे.
धिप्पाड शरीरयष्टी, पिळदार मिशा अन् अंगात खाकी यामुळे हरिभाऊ बांगर यांचे कुस्ती क्षेत्रासह पोलिस दलातही नाव आहे. मूळचे पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावचे बांगर हे सध्या तलवाडा ठाण्यात कार्यरत आहेत. तर जातेगावचे बीट जमादार असल्याने ते गावातील यात्रोत्सवात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र याचवेळी कुस्ती बंदोबस्तावरील बांगर यांनाही डाव खेळण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय वर्दी काढून ते मैदानात उतरले. त्यांचा सामना लातूरच्या रफिक पठाणशी झाला.
जातेगाव येथे झालेल्या कुस्तीच्या आखाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशातील पहेलवानांनी हजेरी लावली होती. हलगीच्या तालावर रंगलेल्या सामन्यात हरिभाऊ बांगर यांनी रफिक पठाणला हरवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर त्यांचा सत्कार करून बक्षीस प्रदान करण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वागत केले.दरम्यान या कुस्तीची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर बांगर यांचे कौतुक देखील होत आहे.
गावागावात कुस्त्याचे आखाडे...
ग्रामीण भागात गावातील यात्रा आणि उरूस यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते. दरम्यान यावेळी कुस्तीचा कार्यक्रम ठेवण्याची अनेक गावात परंपरा आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता यात्रा आणि उरूस भरलेच नव्हते. त्यामुळे गावागावात भरणारे आखाडे ओस पडले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने पुन्हा एकदा जत्रा आणि उरूस भरत आहे. त्यानिमित्ताने कुस्तीचे आखाडे देखील भरवले जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अशा आखाड्यांची वेगवेगळी परंपरा आणि इतिहास आहे.