Dasra Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर आता भगवान गडाचा दसरा मेळावा 'वादा'त
Beed News: भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
Dasra Melava: दरवर्षी मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद न्यायालयाच्या आदेशानंतर मार्गी लागला असतानाच, आता बीड जिल्ह्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी होणारा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या मेळाव्याला गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून खंड पडलेला भगवान गडाच्या पायथ्याशी भरणारा दसरा मेळावा यावर्षी 5 आक्टोबरला भरवला जाणार आहे. भगवान गड दसरा मेळावा कृती समितीचे बाळासाहेब सानप व पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत घेत याबाबत माहिती दिली होती. मात्र या दसरा मेळाव्याला भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नगर आणि बीड जिल्ह्यातील तीन गावातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ज्यात बीड जिल्ह्यातील घोगस पारगा आणि अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी या गावांचा समावेश आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या खंडानंतर भगवान गडाच्या पायथ्याशी भरणारा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
राजकीय भाषणास बंदी...
भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी समितीच्या वतीने काणत्याही राजकीय नेत्याला निमंत्रित केले जाणार नाही. सोबतच गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी घोषित केल्याप्रमाणे गडावर कोणतेही राजकीय भाषण होणार नसल्याची माहिती मेळावा कृती समितीने दिली आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी ज्यांना यायचे, त्यांनी ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलावे, मेळाव्याला राजकीय स्वरूप राहणार नाही, असेही मेळावा कृती समितीने स्पष्ट केले आहे.
पंकजा मुंडेंचा सावरगावात मेळावा होणार?
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी होणारा बीडच्या सावरगावातील दसरा मेळावा सुद्धा यावेळी होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी बीड जिल्ह्यात दोन दसरे मेळावे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातमी...
Dasara Melava : शिंदे-शिवसेनेत वाद सुरु असतानाच राज्यात आणखी एक 'दसरा मेळावा' होणार
Dasara Melava : ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्यात व्यस्त, लाखोंच्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण?