Beed Crime: 'साहेब मी बायकोला संपवलं'; कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या, आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
Beed Crime News: पत्नीची हत्या केल्यावर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन, आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Beed Crime News: बीडच्या (Beed) केज तालुक्यातील ढाकेफळ शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली असून, रागाच्या भरात पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतला आहे. पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या पतीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यावर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन, आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती भगवान थोरात (वय 25 वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव असून, भगवान शाहूराव थोरात असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई महामार्गांवर केज येथे भगवान थोरातचे ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज आहे. दरम्यान मंगळवारी तो दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गॅरेजवरून घरी आला. दरम्यान यावेळी दोन्ही पती-पत्नीत वाद झाला. वाद एवढा वाढला की, संतापलेल्या भगवान थोरातने पत्नीला खालीपाडून कुऱ्हाडीने तिच्या गळ्यावर सपासप वार केला. भगवान याने केलेल्या हल्ल्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी भगवान थोरात याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु आहे.
हत्या केल्यावर स्वतः पोलीस ठाण्यात हजर!
पत्नीसोबत झालेल्या वादानंतर भगवान यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा जीव घेतला. दरम्यान पत्नीचा जीव गेल्यावर भगवान थोरात हे स्वतः युसूफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलीस ठाण्यात गेल्यावर तिथे असलेल्या ठाणे अंमलदारांना आपण आपल्या पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांची घटनास्थळी पाहणी...
याबाबत माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच घटनास्थळी पंचनामा करत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता. आरोपी भगवान थोरात याच्यावर पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
तर अनर्थ टळला असता...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा घरात इतर कोणीही नव्हते. मुले शाळेत, आई-वडील बाहेरगावी गेले होते. त्यामुळे पती, पत्नीतीचा वाद सोडवण्यासाठी तिथे कोणीच नसल्याने वाद आणखीच विकोपाला गेला. यावेळी जर कोणी घरात असते तर हा अनर्थ टळला असता अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad : औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक