Beed: आमच्या भविष्याचं काय? तरुण शेतकरी विरोधी पक्षनेत्यासमोर ढसाढसा रडला
Beed News: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Beed News: आधी कोरडा आणि आता गेल्या तीन वर्षांपासून ओल्या दुष्काळ्याच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी आपल्या व्यथा सांगताना एका तरूण शेतकऱ्यांला अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांचे दुःख सांगताना तो अक्षरशः ढसाढसा रडला. त्याला रडताना पाहून उपस्थित सगळेच सुन्न झाले होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक परिस्थितीत नोकरी नाही,कुठे काम मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण प्रचंड नैराश्यात गेले आहेत. भविष्यात आपलं काय होणार आहे हे कुणालाच काहीच कळत नाही, असे सांगताना तो ढसाढसा रडायला लागला.
खोके सरकारचे शेतकरी विरोधी धोरण: दानवे
यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, एकीकडे रबर स्टॅप मुख्यमंत्री महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करु असे आश्वासित करत आहे. त्याचवेळी राज्यात दिवसाला दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करताय. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज बीड जिल्हातील समनापुर येथील नवनाथ शेळके या आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाला लवकरात लवकर मदत देण्याचे सुचना केल्या आहेत. दिड लाख रुपयांचे कर्ज व्याजासह साडेपाच लाखांवर जाऊन पोहचले. कर्ज कसे फिटणार याची चिंता उराशी घेऊन या शेतकऱ्याने मुत्यू जवळ केला, असल्याचं दानवे म्हणाले.
सरकारकडून फक्त घोषणाबाजी
अतिवृष्टीबाबत एक रुपयाची सरकारी मदत शेतकऱ्याला अजून मिळाली नाही. फक्त घोषणाचा पाऊस होतोय. अतिवृष्टी, बॅंकांची थकबाकी, यंदाची खरीप व दुबार पेरणीसाठी खाजगी सावकारांकडून 15-20 टक्क्यांनी कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे खोके सरकारला हात जोडून विनंती आहे की, दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगन तसेच तुमच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी नाट्य दुर झाले असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच: दानवे
दसऱ्या मेळावाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देतांना दानवे म्हणाले की, अनेक वर्षाचे परंपरा असलेल्या दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरच मार्गदर्शन करणार असल्याचं दानवे म्हणाले आहे. एक पक्ष एक नेतृत्व ही आमच्या कामाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे कोणी कुठेही जाऊ शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच भरणार असेही सुद्धा दानवे म्हणालेत.