पालकमंत्र्यांनी भ्रष्ट अधिकारी अन् वाळूचा धंदा करणारे पोलिस आणले, भाजपच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Laxman Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची अनेकवेळा तक्रार केली, पण भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेतली नसल्याने हताश होऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असं गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार म्हणाले.
बीड : सत्ताधारी आमदार असतानाही आपल्या मतदारसंघातील सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या आणि मर्जीतले लोक नियुक्त करण्यात आले असं सांगत गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांनी गेवराईमध्ये वाळूचा धंदा करणारे पोलिस आणि भ्रष्ट अधिकारी आणल्याचा आरोपही त्यांनी केला. धनंजय मुंडे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही अशी खंत आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली.
लक्ष्मण पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेवराई मतदारसंघात चांगले अधिकारी द्या म्हणून अनेक वेळा पक्षाला विनंती केली. वाळूचा धंदे करणारे पोलिस आणि महसूल अधिकारी इथे आणले जात आहेत. पालकमंत्र्यांनी गेवराईत सर्व भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी आणून ठेवले आहेत.
सत्ताधारी आमदार असूनही विरोधकांना निधी दिला
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेत प्रत्येक ठिकाणी त्या त्या आमदारांचं मत विचारात घेतलं गेलं आहे, पण मला विचारले देखील नाही. संजय गांधी निराधार योजनेतील समिती बरखास्त करून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मर्जीतील लोक भरले आहेत. सत्ताधारी पक्षातील मी एकमेव आमदार असताना माझ्या मतदारसंघातील सर्वच समित्या बरखास्त करण्यात आले आहेत. माझ्या विरोधकांचे नाव देवून त्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
येत्या 15 दिवसांत निर्णय घेणार
आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, गेवराई मतदारसंघातील मला मानणाऱ्या लोकांनी आज बैठक घेतली. दहा वर्षांपूर्वी पंडित कुटुंबाशिवाय इथे कोणीही निवडून आले नव्हते. गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितल्यावर मी निवडणुकीत उभा राहिलो आणि लोकांनी दोन वेळा मला निवडून दिले. पण मी निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केल्यानंतर लोकांना वेठीस धरणाऱ्या पंडित कुटुंबांच्या हाती सत्ता द्यायची का असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. कुठलाही पंडित लोकप्रतिनिधी झाला नाही पाहिजे असा आज आम्ही निर्णय घेतला आहे. जे इच्छुक आहेत त्यांची नावे मागितली आहेत. येत्या 15 दिवसात मी निर्णय घेणार आहे.
पंकजा मुंडेंकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला
मी पक्षावर नाराज नाही असं म्हणत आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अनेकदा सांगूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नाही म्हणून हताश होवून मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजाताई यांना अनेकवेळा त्यासंबंधी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकजाताईंनी कधीच वेळ दिला नाही. त्या सतत मुंबईत राहायच्या. इथे भाजप कार्यकर्त्यांवर खूप अत्याचार झाला. मी वरिष्ठांना त्याबद्दल अनेक वेळा सांगितले पण कोणीही ऐकले नाही.
ही बातमी वाचा: