Beed Crime : तरुणाच्या धमक्यांना कंटाळून गळफास; आठ दिवसांवर साखरपुडा असतानाच उचलले टोकाचे पाऊल
Beed Crime News : विशेष म्हणजे आठ दिवसांवर साखरपुडा आला असतांना या तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली
Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, तरुणाच्या धमक्यांना कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांवर साखरपुडा आला असताना या तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनीषा परमेश्वर घुले (वय 19 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तर वैभव रामराज मुंडे असे धमक्या देणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे.
अधिक माहिती अशी की, बीडच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील 19 वर्षीय मनीषा घुले नावाच्या तरुणीने गावातीलच तरुणाच्या धमक्यांना कंटाळून राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. तर मनीषाचं 23 तारखेला साखरपुडा आणि लग्न 28 जुलै रोजी होणार होते. परंतु, गावातील तरुण वैभव मुंडे हा मनीषाला 'माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करेन' अशा धमक्या लग्न जमल्यापासून देत होता. अखेर त्याच्या धमक्यांना कंटाळून मनीषाने आत्महत्या केली.
पोलिसांत गुन्हा दाखल...
आई-वडील शेतात गेल्यावर मनीषाने सकाळी 11 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा आतमधून बंद करुन घेतला. त्यानंतर घरातील फॅनला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिंचवण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी मुलीचे वडील परमेश्वर बजरंग घुले यांच्या तक्रारीवरुन वैभव मुंडे याच्यावर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच आरोपी वैभव मुंडे फरार झाला आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलूस पथक नियुक्त करण्यात आले आहे.
आठ दिवसांवर साखरपुडा तर 28 जुलैला होणार होते लग्न...
मयत मनीषाचे परळी तालुक्यातील रेवलीवाका सिरसळा येथील तरुणासोबत लग्न जमले होते. तर 23 जुलैला साखरपुडा आणि 28 जुलै रोजी लग्न होणार होते. त्यामुळे घरात लग्न कार्याची तयारी सुरु होती. तर आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या साखरपुड्याची खरेदी देखील झाली होती. परंतु, मनीषा ही वैभवच्या धमक्यांना घाबरून गेली होती. तसेच आपले लग्न मोडते की काय, अशी तिला भीती वाटत होती. या भीतीमुळेच तिने आत्महत्या केली
इतर महत्वाच्या बातम्या :
काय सांगता! जावयाला सासरवाडीत बोलावून बदडले; सासू, सासरे, पत्नी व मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल