आम्ही आंबेडकरवादी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांबरोबर खंबीरपणे उभे आहोत; नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
bhagwangad namdev shastri: भगवान गडाच्या नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता लक्षात घेण्याचे वक्तव्य

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपांच्या गर्तेत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. नामदेव शास्त्री (namdev shastri) यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता लक्षात घेण्याची भाषा केली होती. तसेच भगवान गड धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला सचिन खरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे नामदेव शास्त्री बाबा यांची गुरुवारी भेट घेतली होती. यानंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असे सांगितले. परंतु बीडमधील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. राज्यात घराघरात एकच चर्चा चालू आहे, सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे यासाठी जे मध्यंतरी मोर्चे काढले त्यापैकी एका मोर्चामध्ये मी स्वतः सहभाग घेतला होता. अजूनपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांना धमकी येत असल्याचे समजत आहे, बाब अत्यंत गंभीर आहे, परंतु आता आम्ही आंबेडकरवादी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयाबरोबर आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( खरात गट) सचिन खरात यांनी सांगितले.
धनुभाऊ म्हणाले मला न्यायाचार्यांचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्मपीठाचा पाठिंबा ही सामाजिक समस्या
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही भाष्य केले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुरावे पोलिसांनी सार्वजनिक करावेत.
धर्मपीठाने धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आहे, हा एक सामाजिक समस्या म्हणून मी पाहतोय. मुळात लोकांना निर्णय घ्यायचा असेल तर पोलिसांनी त्यांच्याकडील पुरावे आहेत ते लोकांसमोर मांडले पाहिजेत. तरच लोक निर्णय घेऊ शकतात, नाहीतर कोणी निर्णय घेऊ शकत नाहीत. याप्रकरणाचे एबीसीडी माहिती नसताना लोक काय निर्णय घेणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.
नामदेव शास्त्री काय म्हणाले होते?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला असताना नामदेव शास्त्रींनी त्यांची पाठराखण केली होती. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही आहे, हे मी १०० टक्के सांगू शकतो. भगवान गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. पक्षाचे नेते आहेत, त्यांनाही याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय किती ताणायचा किंवा धरायचा, हा ज्याचा त्याचा विषय आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. गेल्या 53 दिवसांपासून त्यांची मिडिया ट्रायल सुरु आहे. भगवान गड त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
