Beed News : शाळेची बिकट वाट... पहिल्या दिवशी चिखलातून मार्ग काढत विद्यार्थ्यांनी शाळा गाठली
दोन वर्षांनंतर शाळा भरल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मात्र विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी शाळेला जाण्याची वाट चिखलामुळे बिकट झाली.
बीड : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा दोन वर्षानंतर आता पूर्णक्षमतेने भरु लागल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देखील शाळेत जाण्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मात्र विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी शाळेला जाण्याची वाट चिखलामुळे बिकट झाली.
कोणाची सायकल चिखलात रुतली तर कोण सायकल उचलून घेऊन शाळेत निघालं. बीड शहरात असलेल्या राजमुद्रानगरमधला हा प्रकार घडला. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची अवस्था चिखलमय झाली आणि पोरांच्या शाळेला सुट्टी मिळाली.
शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी गणवेश आणि आपले दप्तर घेऊन शाळेची वाट धरली खरी मात्र शाळेजवळ येताच या चिखलात त्यांच्या सायकल रुतू लागल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परत घरीही जाता येईना आणि शाळेतही जाता येईना. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या सायकली इथेच सोडून दिल्या आणि ते परत घरी गेले.
या चिखलामुळे फक्त विद्यार्थ्यांची शाळाच बुडाली नाही तर सकाळपासून या गल्लीमध्ये ना दूधवाला आला ना कुणाला आपल्या घरातून बाहेर पडता आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी नगरपालिकेकडे केली आहे.
बीड शहरात सध्या ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच अंडरग्राऊंड नाल्यांची कामे सुरु झाली आहेत आणि त्यामुळे रस्त्यांची अशी दूरवस्था झाली आहे. याच भागात दोन मोठ्या शाळा असल्याने विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरुन शाळेत जावं लागतं. मात्र पाऊस पडल्यावर वारंवार या रस्त्यावर चिखल होत असल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी झाली आहे.
आधीच कोरोनामुळे घरात असलेली ही मुलं आता कुठे शाळेत जायला तयार झाली होती. पण शाळेत जाणारी ही वाट इतकी बिकट झाली की पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचेपर्यंत या विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. बीडचे भूषण म्हणून घेणारे नेतृत्व आणि विकसनशील चेहरा असे बिरुदावली लावणाऱ्या नेत्यांनी एकदा या वाटेवरुन चालायला हवं, असं इथले नागरिक म्हणतात.