Beed : धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठं यश, परळीतील उड्डाणपुलाच्या कामासाठी 100 कोटी मंजूर
Dhananjay Munde : परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले.
बीड : परळी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या आणि थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने 100 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्याच्या मागणीला मोठ यश आले आलं आहे.
निधी मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये राज्य मार्ग 548 ब वरील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व राज्य मार्ग 361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे व त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी 100 कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, धनंजय मुंडे यांनी समस्त परळीवासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल हे रहदारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असून, अनेक वर्षांपासून हे उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत होते या रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण झाल्याने धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील आणखी एका वचनाची पूर्ती देखील होणार आहे.
दरम्यान अंबाजोगाई ते लातूर रस्त्यातील वाघाळा पूल ते लातूर जिल्हा हद्द या 14 किलोमीटर रस्त्याचे काँक्रीट चौपदरीकरण करण्याची मागणी देखील गडकरी यांनी मान्य असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने याबाबतचा 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.
धनंजय मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीत या पुलाचे वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखित करत, चौपदरी विस्तार करण्याची तसेच अंबाजोगाई लातूर रस्ता विस्तारित करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अन्य काही राष्ट्रीय महामार्ग व पुलांच्या विस्तार व दुरुस्तीचीही मागणी केली होती. त्या अन्य मागण्यांना देखील टप्प्याटप्प्याने या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होणार असल्याचं मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.