Kshirsagar Family: बीडच्या राजकारणातील क्षीरसागर कुटुंब! एकाच घरात राहात असले तरी प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा..
Beed News : बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाची नेहमीच चर्चा होत असते.
Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील राजकारण नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे. आधी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) विरुद्ध धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आता जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यामुळे बीडचे राजकारण गाजले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबातील काका-पुतण्याचे वाद संपले. मात्र, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे. त्यातच आता जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तर पाहू यात क्षीरसागर कुटुंबातील राजकीय इतिहास आहे तरी कसा...
क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय इतिहासाची सुरवात सोनाजीराव क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच माजी खासदार केशर काकू यांच्यापासून होते. मूळच्या कर्नाटकमधील माहेर असलेल्या केशर काकू यांचे सोनाजीराव क्षीरसागर यांच्यासोबत विवाह झाला. तसं सोनाजीराव क्षीरसागर याचं त्यावेळी गावात आणि परिसरात दबदबा होता. पण ज्या काळात महिलांना घरा बाहेर पडण्याची परवानगी मिळत नव्हती त्यावेळी सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात पुढे आणलं. पुढे त्या पंचायत समितीसभापती, खासदार झाल्या. तेव्हापासून सुरु झालेला क्षीरसागर कुटुंबाचा राजकीय वारसा अजूनही सुरूच आहे.
एकाच घरात राहात असले तरी प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा...
मागील काही दिवसांत जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद चर्चेचा विषय बनला आहे. काका-पुतण्याचा वाद निवडणुकीत अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. त्यातच आता जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या गटात सहभागी होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे क्षीरसागर कुटुंबातील राजकीय वाद कितीही टोकाचे असले तरीही हे कुटुंब एकाच घरात राहतात. बीड शहरातील नगर रोडवर क्षीरसागर कुटुंबाचा बंगला आहे. याच बंगल्यात चार भावांची एकूण दहा कुटुंबं राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा असला तरीही घर मात्र एकच आहे.
क्षीरसागर कुटुंबाची वंशावळ
सोनाजीराव क्षीरसागर आणि केशर काकू क्षीरसागर यांना एकूण चार मुलं होती. ज्यात जयदत्त क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. विठ्ठल क्षीरसागर समावेश आहे. तर या चार भावांपैकी डॉ. विठ्ठल क्षीरसागर राजकारणापासून लांब राहिले. तर, जयदत्त क्षीरसागर यांना दोन मुलं असून, ज्यांची नावं रोहित क्षीरसागर आणि हर्षद क्षीरसागर आहे. रविंद्र क्षीरसागर यांना तीन मुलं आहेत. ज्यांची नावं संदीप क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर असे आहेत. तर, डॉ. भारतभूषण यांना एकच मुलगा असून, ज्याचं नाव योगेश क्षीरसागर आहे.
राजकीय कारकिर्द
- जयदत्त क्षीरसागर : बीड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, चार वेळा आमदार तथा राज्यमंत्री.
- रवींद्र क्षीरसागर : गजानन साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य.
- डॉ. भारतभूषण क्षीरसागर : बीड नगर परिषदेमध्ये 35 वर्ष नगराध्यक्ष.
- संदीप क्षीरसागर : पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, बीड विधानसभा मतदारसंघ आमदार.
- डॉ. योगेश क्षीरसागर : बीड नगरपरिषद सदस्य.
- हेमंत क्षीरसागर : नगरपरिषद सदस्य, नगरपरिषद उपाध्यक्ष.
इतर महत्वाच्या बातम्या: