पाचवे ज्योतिर्लिंग परळीत की झारखंडमध्ये?; वैद्यनाथाचं दर्शनानंतरही राष्ट्रसंत मोरारी बापूंचं मौन
Vaijnath Jyotirlinga : राष्ट्रसंत मोरारी बापू हे परळी येथील वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
Vaijnath Jyotirlinga : देशातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पाचवे ज्योतिर्लिंग (Jyotirling) हे परळीत आहे किंवा नाही यावरुन वेगवेगळे दावे केले जातात. विशेष म्हणजे पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचे स्थान झारखंड येथे असल्याचे वक्तव्य काही दिवसापूर्वी राष्ट्रसंत मोरारी बापू यांनी केलं होतं. तसेच देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण रामकथा करत असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, अशातच राष्ट्रसंत मोरारी बापू हे परळी येथील वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मात्र यावेळी त्यांनी वैद्यनाथाचे धाम हे झारखंडमध्ये आहे की, परळीमध्ये आहे यावर त्यांनी मौन बाळगले. तर, मोरारी बापू हे परळीमध्ये आल्यानंतर स्वतः कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे परळीत स्वागत केले आणि त्यांना वैजनाथ ज्योतिर्लिंगाची माहिती दिली.
बीडच्या दौऱ्यावर आलेल्या संत मोरारी बापू यांच्या दौऱ्यामध्ये कुठेही परळी येथील वैजनाथाच्या दर्शनाचे नियोजन नव्हतं. मात्र, औंढा नागनाथ येथे दर्शन करण्यासाठी जाताना परळीवरुन जावे लागते. दरम्यान, यावेळी जाताना त्यांनी परळीमध्ये वैजनाथाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे ज्या 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ते राम कथा करणार आहेत, त्यामध्ये परळीचा समावेश नाही. त्यामुळे ते हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे रामकथा करण्यासाठी रवाना झाले. तर संत मोरारी बापू यांनी परळीमध्ये राम कथा न घेतल्याने आणि वैद्यनाथाचे धाम हे झारखंडमध्ये आहे या क्तव्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
काय आहे वाद?
देशात आलेल्या एकूण 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पाचवे ज्योतिर्लिंग (Jyotirling) हे परळीत आहे. त्यामुळे देशभरातून भाविक याठिकाणी येत असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून यावरुन नवीनच वाद समोर आला आहे. देशात आलेल्या एकूण 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पाचवे ज्योतिर्लिंग परळीत नसून, झारखंडमध्ये असल्याचा दावा काही लोकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संत मोरारी बापू यांनी देखील पाचवे ज्योतिर्लिंग झारखंडमध्ये असल्याचं म्हटले होते. त्यामुळे यावरुन संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष बीडच्या दौऱ्यावर आलेल्या संत मोरारी बापू यांनी यावर कोणतेही प्रतिकिया दिली नाही. त्यामुळे ते आपल्या दाव्यावर ठाम असल्याचा अर्थ काढला जातोय.
धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात मांडला होता मुद्दा...
विशेष म्हणजे मागील अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याविषयी आवाज उठवला होता. "परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्र सरकारच्या 'प्रसाद' योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा, केंद्राच्या यादीत परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे नाव वगळून त्याऐवजी झारखंड येथील वैद्यनाथ धामचे नाव गॅझेटमध्ये आहे. त्यात दुरुस्ती करुन परळी येथील प्रभू वैद्यनाथांचे नाव कायम करण्यात यावे. तसेच परळी वैद्यनाथ कॉरिडॉर करण्यास मान्यता व निधी देण्यात यावा, याविषयी लक्षवेधी द्वारे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. तर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत सकारात्मक उत्तर देत प्रसाद योजनेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मागवण्याचे निर्देश दिले असून उर्वरित विषयी तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
बम बम भोले! भारतातील 12 ज्योतिर्लिंग कोणती अन् कुठे? जाणून घ्या