हे सरकार दिलेला शब्द पाळत नाही, मी माझं आयुष्य..., मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाचं टोकाचं पाऊल
मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीवरून अधिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. मात्र, असे असतांना काही तरुण नैराश्यातून थेट आत्महत्या (Suicide) सारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटनाा बीड जिल्ह्यात घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जुन कवठेकर असं तरुणाचे नाव आहे. पहाटेच्या दरम्यान या तरुणाने गळफास घेतला. तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी देखील सापडली आहे. या चिठ्ठीत... सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळे मराठा बांधवानी एकजूट व्हावे असे लिहिले आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. अर्जुन कवठेकर हा उखंडा गावचा रहिवासी आहे. तो खासगी बसचा चालक होता. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर दसरा मेळावा
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायणगडावर 175 एकर मैदानात हा मेळावा होणार असून 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. दरम्यान झालेल्या बैठकीत वीस लाखांचा निधी प्राप्त झालाय. तर मुस्लिम समाजानेही देणगी दिली आहे.
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायणगडावर या : मनोज जरांगे
राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोर येणार आहेत. कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायणगडावरील दसरा मेळाव्याला या, असे मनोज जरांगे म्हणाले.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदे, शरद पवार आणि मनोज जरांगे एकत्र आले तर....; लक्ष्मण हाकेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण?