Beed: पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना नजरचुकीने गेले बारा कोटी!आता पैसे परत मिळवायचे कसे?
पीकविम्यासाठीची लढाई रस्त्यावरुन विधानसभेपर्यंत अन् संसदेपासून थेट न्यायालयापर्यंतआपण बघितली आहे. मात्र आता पिकविम्याचा जो उलटा प्रवास सुरू झाला आहे, तोही तेवढ्याच थक्क करणार आहे.
Beed Latest News: पीक विम्याचे पैसे मिळाले (Crop Insurance) नाहीत म्हणून तुम्ही आतापर्यंत अनेक आंदोलनं बघितली असतील. म्हणजे हक्काचा विमा भेटत नाही म्हणून राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी (Maharashtra Farmer) केवळ रस्त्यावरच संघर्ष केलाय असं नाही तर रस्त्यावरुन विधानसभेपर्यंत अन् संसदेपासून थेट न्यायालयापर्यंत पीक विम्यासाठीची लढाई आपण बघितली आहे. मात्र आता पिकविम्याचा जो उलटा प्रवास सुरू झाला आहे, तोही तेवढ्याच थक्क करणार आहे.
बजाज अलियान्झ या कंपनीकडे काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील पीक विमा घेण्याची आणि नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तो विमा परत देण्याची जबाबदारी होती. मात्र याच कंपनीच्या खात्यातून तब्बल 12 कोटी रुपये बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून जमा झाले आहेत.
बीडच्या किसन मस्के यांच्या खात्यावर बजाज अलियान्झ या कंपनीकडून 11 हजार रुपये जमा झाले खात्यावर पैसे आल्याचा मेसेज त्यांना आल्यावर त्यांनी तात्काळ ते पैसे काढून घेतले. आता ही रक्कम चुकून जरी त्यांच्या खात्यावर जमा झाली असली तरी ती परत करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
12 हजार शेतकऱ्याकडून 12 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर ही चूक बजाज अलियान्झ या कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीने बँकेला पत्र पाठवलं आणि या 12 हजार शेतकऱ्याकडून 12 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश आल्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनीचा दावा फोल असल्याचा दावा केलाय. नुकसानीपोटी भरलेली विम्याची ही रक्कम असून यातील एक रुपयाही कंपनीला परत करणार नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.
बरं ही जी रक्कम चुकून गेलेली आहे ती नेमकी कशाची आहे याची माहिती ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेत त्यांना नव्हती. जी अवस्था शेतकऱ्यांची तीच अवस्था बँकेची पण होती. कारण बँकेच्या माध्यमातून बजाज अलियान्झ कंपनीने हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवले आहेत. आता शेतकऱ्यांनी हे आलेले पैसे परत भरले नाही तर बँक त्यांच्या अकाउंटला होल्ड करू शकते मात्र यावरही शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आहे.
खरंतर राज्यामध्ये सर्वाधिक पीक विमा उचलणाऱ्या यादीत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नंबर राज्यात सगळ्यात आधी लागतो. म्हणूनच शेतकऱ्याला पीक विमा देताना राज्य सरकारने त्याचा काही वाटा उचलला पाहिजे आणि सोबत केंद्र सरकारने उचलला पाहिजे अशी योजना बीडवरून सुरू झाली. मात्र आता नजरचुकीने आलेले कोट्यावधी रुपये शेतकऱ्याकडून वसूल करण्याचा मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
ही बातमी देखील वाचा