काय सांगता! फेसबुकवरील जाहिरात पाहून चक्क बैलजोडी मागवली, शेतकऱ्याची 95 हजारांची फसवणूक
Farmer Online Fraud: शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगत, बैलजोडी न देता फसवणूक केली आहे.

Farmer Online Fraud: ऑनलाइन वस्तू खरेदीच्या नावावर फसवणूक झाल्याच्या घटना आपण अनकेदा पाहत असतो. बीड जिल्ह्यात (Beed District) मात्र चक्क ऑनलाईन बैल खरेदी (Online Purchase Bulls) करण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या शेतकऱ्यांने फेसबुकवरील जाहिरात पाहून खरेदीसाठी बैलजोडी बुक केली होती. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने या शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगत, बैलजोडी न देता त्याची फसवणूक केली आहे. ज्ञानेश्वर दगडू फरताडे (रा. कारी, ता. धारूर) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर फरताडे यांनी 19 जानेवारीला त्यांनी फेसबुकवर बैलजोडीची जाहिरात पहिली. ज्यात ही बैलजोडी विक्रीला असल्याची माहिती देण्यात आली होती. फरताडे यांना देखील बैलजोडी घायची असल्याने त्यांनी जाहिरातवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरील अज्ञात व्यक्तीने सुरवातीलाचा फरताडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बैलजोडी शासकीय वाहनाने पाठवितो असे आश्वासन दिले. मात्र यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगून, ज्ञानेश्वर यांच्याकडून 95 हजार 144 रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलिसात धाव!
फेसबुकवरील जाहिरात पाहून ज्ञानेश्वर फरताडे यांनी बैलजोडीसाठी एका अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून, त्याला 95 हजार 144 रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र पैसे देऊन देखील बैलजोडी येत नसल्याने फरताडे यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर संपर्क केला. मात्र संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचं फरताडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्यात धाव घेऊन दोन अनोळखी व्यापारी व एक अनोळखी वाहन चालक, अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अशी घ्या काळजी!
गेल्या काही वर्षात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीसाठी डिस्काऊंट, मोठी ऑफर, एकावर एक मोफत अशी जाहिरात करून फसवणूक करण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. अनेकदा बनावट वेबसाईटची लिंक देऊन देखील फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशावेळी खरेदी करताना संबंधित अधिकृत कंपनीच्या संकेतस्थळ व वेबसाईटवर जाऊनच ऑनलाइन खरेदी केल्यास अशी फसवणूक टाळता येऊ शकते. तसेच ऑनलाइन खरेदी करताना कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून पैश्यांची देवाणघेवाण करू नयेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed: शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे हडपले, बीडच्या तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
