Beed : एका पोस्टरवर मनोज जरांगे, दुसऱ्या पोस्टरवर पंकजा मुंडे; बीडच्या भाजप जिल्हाध्यक्षांच्या दोन भूमिका चर्चेत
Beed Poster News : बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बैलगाडा शर्यतीमुळे दोन पोस्टर्स लावले असून त्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची भाजप आणि फडणवीस यांच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट आहे. मराठवाड्यात तर भाजप विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष पाहायला मिळतो. मात्र बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या बॅनर्सवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्याचवेळी पंकजा मुंडे आणि इतर भाजप नेत्यांसोबत एक वेगळं बॅनर लावल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाने एकाचवेळी दोन भूमिका मांडल्यामुळे बीडमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचे बॅनर्स चांगलेच गाजत आहेत. कारण एका पोस्टरवर त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासोबत फोटो लावला आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा यांचा फोटो लावल्याचं दिसतंय. त्याचसोबत भाजपच्या इतर नेत्यांचे फोटो त्यांनी त्यावर लावले आहेत. तर मनोज जरांगे यांच्यासोबत लावलेल्या पोस्टरवर राजकीय नेत्याव्यतिरिक्त इतर नेत्यांचे फोटो लावले आहेत. त्यामुळे त्यांचे हे दोन्ही पोस्टर्स चांगलेच चर्चेत आले आहेत.
राजेंद्र मस्के यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी वेगळे बॅनर तयार करून त्यावर भाजपच्या नेत्यांचे फोटो टाकले आहेत. एकाच वेळी दोन भूमिका भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मांडल्यामुळे बीडमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
या आधीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती
बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी या आधीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. ते बीड विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक आहेत. या आधी राजेंद्र मस्के यांनी मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली होती. सरकारने पळपुटा करू नये, मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेत महत्त्वाचा
लोकसभा निवडणुकीवेळी मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेचा भाजपला जोरदार फटका बसला होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला होता. आता तोच फॅक्टर पुन्हा एकदा विधानसभेसाठी चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा होती.
ही बातमी वाचा: