Beed Accident Updates: तीन तरुणांचा बळी घेणाऱ्या एसटी चालकाचे निलंबन; पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Beed Accident Updates: सदर अपघाताची गंभीर दखल एसटी महामंडळाने घेत कुलदीप मुसळे या बस चालकाला एसटी सेवेतून निलंबित केले आहे.
Beed Accident Updates: बीड-परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेलजवळ 19 जानेवारी रोजी तीन तरुण मुलांना धडक दिली. या अपघातामध्ये 3 तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता तीन तरुणांचा बळी घेणाऱ्या एसटी चालकाला निलंबित करण्यात आलं आहे. तर या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी बीड जवळील घोडका राजुरी येथे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तीन तरुणांना भरधाव एसटीने चिरडले होते. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर अपघाताची गंभीर दखल एसटी महामंडळाने घेत कुलदीप मुसळे या बस चालकाला एसटी सेवेतून निलंबित केले आहे. तर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बस चालका विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी एसटीच्या समितीने पाहणी केली होती. समितीने बस चालक कुलदीप मुसळे याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि भरधाव बस चालवल्याने अपघात झाल्याचा अहवाल देऊन बस चालकाला प्रकरणात दोषी ठरवले आहे.
नेमकी घटना काय?
बीड-परभणी मार्गावर पहाटे 6च्या दरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुण मुलांना एसटी बसची धडक बसली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारी मुले चालकाला दिसली नाहीत, असे चालकाचे म्हणणे आहे. दुर्दैवाने या अपघातामध्ये त्या तीनही मुलांचा मृत्यू झाला होता. तर घटनेची माहिती मिळताच या जखमी तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. मात्र उपचारा दरम्यान या तीन तरुण मुलांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील परळी महामार्गावर पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना भरधाव एस.टी. बसने धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हे तिघेही पोलीस भरतीची तयारी करत होते. या घटनेनंतर, ग्रामस्थ आणि बीड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस.टी. महामंडळाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रताप सरनाईक यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या आर्थिक मदतीमुळे पीडित कुटुंबांना थोडासा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे, प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली आहे.