Beed Bank Scam: अखेर बबन शिंदे यांना अटक, बीडमधील 300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई
Beed Bank Scam Case : बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथून पोलिसांनी अटक केली असून दीड वर्षांपासून तो फरार होता.
बीड : तीनशे कोटींचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदे याला उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता आणि तो पोलिसांना चकवा देत होता.
बीडसह जिल्ह्यात पाच ठिकाणच्या शाखांमधून बबन शिंदे याने तीनशे कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला. या प्रकरणात बीडसह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता बीड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये अनेक बँकांकडे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. या घोटाळ्याच्या मालिकेतील सर्वात आधी गुंतवणूकदाराची मोठी फसवणूक बबन शिंदे याच्या मल्टीस्टेट बँकेने केली होती.
बीडमध्ये ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे आणि त्यांचे पती बबन शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Beed Bank Scam Case : प्रकरण नेमकं काय?
लोकांना जास्त व्याजदराचं प्रलोभन दाखवून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटनं ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या. बँकेच्या अध्यक्ष आणि त्यांचे पती तथा संचालक असणाऱ्या बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या. त्यानंतर इतर ठिकाणी यामधील काही पैसा खर्च केला. यासह विविध ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला.
जेव्हा ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या. त्यावेळी बँकेकडे ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यास पैसेच नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, अशी उत्तरं देऊन धुडकावून लावलं जात होतं. पण सातत्यानं अशीच उत्तरं मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरुन बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे, त्यांचे पती बबन शिंदे, मनीष शिंदे, अश्विनी सुनील वांढरे आणि बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणात अखेर पोलिसांनी बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे यांना अटक केली.
ही बातमी वाचा: