(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत जल्लोषात स्वागत; आजचा मुक्काम केज तालुक्यात
Gajanan Maharaj Palkhi : शेगाव ते पंढरपूर पायी वारी 33 दिवसांची असून, वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.
Ashadhi Wari 2023 : टाळ-मृदुंगाच्या तालात आणि विठ्ठल नामजपात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Palkhi) बुधवारी ( 14 मे) रोजी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. यावेळी भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. संत गजानन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यास ठिकठिकाणी गर्दी झाली होती. यावेळी गजानन महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तर अंबाजोगाईकरांच्या सुख समाधानासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी यंदा पुरेसा पाऊस येऊ दे आणि शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे, असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी घातले. तर आज सकाळपासून 11 किलोमीटरचा प्रवास करून गजानन महाराजांची पालखी दुपारचा विसावा लोखंडी सावरगांव घेणार आहे. त्यानंतर पुढे आणखी 9 किलोमीटरचा प्रवास करत बोरी सावरगांव येथे मुक्काम करणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दुपारी दोन वाजता अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौकात आगमन झाले. यावेळी अंबाजोगाईकरांनी पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत केले. शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, मंगळवार पेठ, पाटील चौक, मंडीबाजारमार्गे योगेश्वरीच्या मंदिरात पालखी दाखल झाली. तिथे आरती होऊन पालखीतील वारकऱ्यांनी एकादशीचा फराळ घेतला.
दरम्यान, पालखी मार्गावर महिलांनी सडा शिंपून आकर्षक रांगोळ्या मांडल्या होत्या. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. सायंकाळी सात वाजता योगेश्वरी मंदिरातून पालखी निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे ती शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विसावली. रात्री या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला तर आज सकाळी पालखीचे लोखंडीसावरगावमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
पालखीचा 750 किलोमीटरचा प्रवास
- गजानन महाराज पालखीसोबत सातशे वारकरी, तीन अश्व, नऊ गाड्या आणि रुग्णवाहिका आहे.
- पालखी 27 जूनला पंढरपूरला पोहोचणार असून, दिंडी नऊ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे.
- शेगाव ते पंढरपूर पायी वारी 33 दिवसांची असून, वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.
असा असणार परतीचा प्रवास...
श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी पंढरपूरमध्ये पोहोचणार. याठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस मुक्काम असणार आहे. दरम्यान 03 जुलै रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर निघणार आहे. ज्यात एकूण 22 मुक्काम असणार आहे. दरम्यान 24 जुलै रोजी श्रींची पालखी शेगावला परत पोहोचणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी दाखल