अखेर ठरलं! शरद पवारांच्या बीडच्या सभेला अजित पवारांकडून मिळणार अशाप्रकारे उत्तर; याबाबत मंत्रालयात झाली बैठक
Ajit Pawar Meeting in Beed : बीडच्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता अजित पवार विकास कामांचा लेखाजोखा मांडणार आहेत.
Ajit Pawar Meeting in Beed : राष्ट्रवादी (NCP) पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी शरद पवारांनी बीडमध्ये (Beed) सभा घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार देखील बीडमध्ये 27 ऑगस्ट रोजी सभा घेणार आहे. मात्र, या उत्तर सभेतून अजित पवार हे शरद पवारांना कसे उत्तर देणार याबाबत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर, बीडच्या सभेत कसे उत्तर द्यायचे याबाबत आज अजित पवारांनी मुंबईत बीडच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, यावेळी, बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे ठरले आहे.
बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा आणि महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित आणि तातडीची कामं तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात माहिती दिली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीडच्या सभेतून अजित पवारांकडून शरद पवारांना विकास कामांची घोषणा करून उत्तर दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर सभेत विकास कामांची घोषणा...
माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली. तसेच, बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे. आज अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उत्तर सभेत विकास कामांची मोठ्या प्रमाणात घोषणा होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: