शरद पवारांच्या बीडमधील सभेविरोधात अजित पवारांची उत्तर सभा? धनंजय मुंडेंकडून सभेचं आयोजन
Sharad Pawar VS Ajit Pawar: आगामी काळात राज्यातील राजकारण आणखीच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट निर्माण झाले आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्याकडून अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात सभा घेण्यात येत आहे. यापूर्वी छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच, येवल्यात शरद पवारांची सभा झाली आहे. तर, आता उद्या धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, आता शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजित पवार यांची 27 ऑगस्ट उत्तर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण आणखीच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
उद्या शरद पवारांची बीडमध्ये सभा होणार आहे. शरद पवारांची सभा पार पडल्यानंतर 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभा घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर उत्तर सभेचं धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या सभेवरून राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.
अजित पवार म्हणाले होते, मलाही बोलावे लागेल
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. आम्हीही पक्ष बांधला, आम्हालाही लोक ऐकतात. आम्हीही नेते आहोत. जर पवार साहेबांनी सभा घेतल्या, तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सभा घ्यावी लागेल. असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले होते. त्यानंतर, आता शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजित पवार देखील सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुन्हा पाहायला मिळणार काका-पुतण्याचं 'राजकारण'
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याच्या राजकारणाची नेहमीच चर्चा असते. दरम्यान, आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या निमित्ताने हे राजकीय युद्ध पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण शरद पवारांच्या टीकेला आता अजित पवार देखील उघडपणे जाहीर सभेतून उत्तर देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या बीडमध्ये हे राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहे, त्याच बीड जिल्ह्याच्या राजकारणात यापूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने काका-पुतण्याचे राजकीय वाद महाराष्ट्राने बघितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar in Beed : शरद पवारांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा; धनंजय मुंडेंच्या बंडखोरीवर काय बोलणार?