मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; सुसाईड नोट लिहून ठेवली
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच बीड शहरातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केली आहे.
बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याची घोषणा आजच्या बीड (Beed) शहरातील इशारा सभेतून होणार आहे. त्यामुळे बीड शहरात कालपासून भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे. या सभेकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) सभेच्या पूर्वसंध्येलाच बीड शहरातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केली आहे. मधुकर खंडेराव शिंगण (वय 50 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
एकीकडे बीड शहरात मनोज जरांगे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु होती, तर दुसरीकडे शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये राहणाऱ्या मधुकर शिंगण यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी मयत मधुकर शिंगण यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राम राम... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं वृत्त कळताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे
धाराशिव जिल्ह्यात देखील तरुणाची आत्महत्या...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असतानाच तिकडे धाराशिव जिल्ह्यात देखील एका 24 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य संपवलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गिरवली येथील अमरनाथ कदम या तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी खिशात मराठा आरक्षणाच्या नावाची चिठ्ठी देखील त्याने लिहून ठेवली होती. अंजनसोंडा शिवारातील गट नंबर 51 मधील स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावातील साखळी उपोषणामध्ये अमरनाथचा सहभाग पाहायला मिळायचा.
आत्महत्या करू नका, जरांगेंचं तरुणांना आवाहन...
मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना दुसरीकडे तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान, मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नयेत असे आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून प्रत्येक सभेत केले जात आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे तरुणांनी आत्महत्या सारखे निर्णय घेऊ नये असेही जरांगे म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या, मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी