धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या, मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी
Maratha Reservation : विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्या (Suicide) सत्र सरूच असल्याचे पाहायाला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या 39 वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी (13 डिसेंबर) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. विजय पुंडलिक राकडे (वय 39 वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता. याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर, मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहलं आहे?
विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, "माझ्या मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मीपूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आले आहे.
आत्महत्या सत्र सुरूच...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच गावागावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु असल्याने हा मुद्दा आता गावपातळीवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे अनेक तरुण आरक्षणाच्या आंदोलनात उतरतांना पाहायाला मिळत आहे. मात्र, हा मुद्दा लवकर मार्गी लागत नसल्याने हताश होऊन तरुण आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे तरुणांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन सरकार आणि मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: