Beed: शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी , शिक्षणाधिकाऱ्यांनी केली घोषणा
Beed:बीड शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढले असून जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
Beed: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या बीडमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅलीचे( Beed Maratha Reservation Rally) आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून सर्व प्राचार्य मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
बीड शहरात होणाऱ्या गर्दीमुळे शाळा बंद
बीडमध्ये उद्या मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीसह जनसंवाद सभेचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरात होणारी गर्दी लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या 11 जुलै रोजी बीड शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य रस्ते बंद राहणार आहेत. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी दिलेल्या निर्देशानुसार, बीड शहरातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांना गुरुवारी एका दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत बीड शिक्षणाधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी केले आहे.
बुडलेला पाठ्यक्रम यादिवशी पूर्ण करण्याच्या सूचना
गुरुवारी सुट्टी देण्यात आल्याने 11 जुलैच्या तासिका, पाठ्यक्रम, अर्धी शाळा असेल तेव्हा पूर्ण करून घेण्यात येण्याची सूचनाही करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात हा पाठ्यक्रम पूर्ण शाळा घेऊन पूर्ण करण्यात यावा असे परीपत्रकात सांगण्यात आले आहे.
रॅलीच्या परवानगी पण सभेला नाही
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी (Beed Police) परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडून मराठा समन्वयकांना करण्यात आलेली आहे. समाज बांधवांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांची परवानगी नाही. परंतु यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार आहे.
आठ तारखेलाच दिली परवानगी- धनंजय मुंडे
जरांगे यांच्या बीडमधील रॅलीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात अधिक माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यात मराठा समाजाने शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. पण प्रशासनाने या रॅलीला परवानगी नाकारली अशी अफवा पसरवण्यात आली आहे. पण सत्यस्थिती अशी आहे की 8 तारखेला या शांतता रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. मी मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. म सुद्धा त्यांच्या लढ्यात सामील झालो होतो, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच शांतता बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
हेही वाचा:
जरांगेंच्या रॅलीला होकार पण सभेला मात्र बीड पोलिसांची परवानगी नाही; नेमकं कारण काय?