New Mercedes-Benz C-Class C300d Review: टेक आणि लक्झरीचे परफेक्ट कॉम्बिनेशन
Mercedes-Benz: जर्मनीची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझच्या लक्झरी कारची मागणी जागतिक आणि भारतीय बाजारात वाढताना दिसत आहे.
Mercedes-Benz: जर्मनीची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझच्या लक्झरी कारची मागणी जागतिक आणि भारतीय बाजारात वाढताना दिसत आहे. कंपनीच्या ई-क्लासपासून ते एस-क्लासपर्यंत, मर्सिडीज-बेंझ आपल्या सेडानसाठी प्रसिद्ध आहे. अशातच आता सी-क्लासची संपूर्ण नवीन लक्झरी कार कंपनीने सादर केली आहे. नेक्स्ट जनरेशन सी-क्लास विक्रीच्या दृष्टीने कंपनीसाठी महत्वाची कार आहे. याच्या आधीच्या मोठ्या आवृत्तीसारखेच या कारमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहे. ग्राहकांनी याचे नामकरण 'बेबी एस-क्लास' म्हणून केले आहे.
आपल्या आधीच्या कारच्या तुलनेत ही कार खूपच आधूनिक आणि वेगळी आहे. या कारची लांबी 65 मिमी असून याची रुंदी 10 मिमी आहे. यामुळेच नवीन सी-क्लास आता आधीपेक्षा अधिक प्रीमियम दिसते. कंपनीच्या C200 आणि C220 अधिक पारंपारिक स्टाइलिंग पॅकेजमध्ये येतात. मात्र कंपनीची ही नवीन कार पूर्ण वेगळी आहे. यामध्येच आम्ही चालवलेली कार ही ऑल-आऊट स्पोर्टी C300d होती, जी AMG-लाइन ट्रिममध्ये येते.
या नवीन कारमध्ये बरेच फीचर्स S-Class मधून घेण्यात आले आहे. एस-क्लास ही 1.5 कोटी प्लस लक्झरी कार आहे. याच्या इन्फोटेनमेंट सिस्टमच्या बाबतीतही तोच अनुभव ग्राहकांना मिळेल. स्क्रीन किंवा डिस्प्ले गुणवत्तेसाठी हॅप्टिक फीडबॅक आहे, तर नेव्हिगेशनसाठी 3D मॅप आहे. या कारमध्ये तुम्ही फिंगरप्रिंट ओळखद्वारे देखील प्रवेश करू शकता. C300d मध्ये जोडलेल्या इतर काही फीचर्समध्ये डिजिटल लाइट्स, टू -झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि स्टीयरिंग व्हील आणि बरेच काही समाविष्ट आहे.
नवीन सी-क्लास आता लांब व्हीलबेससह अधिक प्रशस्त आहे. तर ही आपल्या आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आरामदायी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात Si च्या तुलनेत मागील बाजूस निश्चितपणे अधिक जागा देण्यात आली आहे. या कारच्या खालच्या रूफवरील रेषेमुळे उंच प्रवाशांना बाहेर पडणे थोडे कठीण होते. कारच्या आतमध्ये बऱ्यापैकी बूट स्पेस ग्राहकांना मिळेल.
यात पूर्वीच्या सी-क्लासपेक्षा मोठा बदल म्हणजे ड्रायव्हिंगचा अनुभव. आम्ही चालवलेली कार C300d होती. जी 550 Nm टॉर्कसह चार-सिलेंडर 265bhp डिझेल इंजिनसह सर्वात पॉवरफुल C-क्लास आहे. स्टॅंडर्ड गिअरबॉक्स 9-स्पीड स्वयंचलित आहे. C300d ही फक्त 5.7 सेकंदात 0-100 किमी/ताशी गती प्राप्त करते, असा दावा कंपनीने केला आहे. यात 48v माईल्ड हायब्रीड सिस्टम देण्यात आले आहे. जे 20hp आणि 200Nm टॉर्क अतिरिक्त जोडते.