भारतात लवकरच सुरू होणार हायड्रोजनवर चालणारी बस? केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडची चाचणी यशस्वी
हायड्रोजन निर्मितीमुळे शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होणार आहे. शिवाय डिझेलएवजी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. शिवाय डिझेल आयात करण्याचा खर्च कमी होईल.
नवी दिल्ली : भारतात नुकतीच स्वदेशी स्वरूपात विकसीत करण्यात आलेल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सेंटियंट लॅब, R&D इनोव्हेशन लॅब आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडची (KPIT Technologies Ltd ) यांच्याकडून ही बस तयार करण्यात आली आहे. हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद), NCL (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) आणि CSIR-CECRI (सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) यांच्या सहकार्याने ही बस विकसित करण्यात आली आहे.
हायड्रोजनवर चालणारी वाहने तयार करण्याचे केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचचे उदिष्ट आहे. या लॅबने बॅटरी, इंधन सेल तंत्रज्ञान आणि हायड्रोजन निर्मितीला येणारे अडथळे जाणून हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. नुकतेच सेंटिंट लॅबने वाहनांसाठी शेतीतील उत्पादनावर हायड्रोजन तयार करण्याचे जगातील पहिले तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडने बॅलन्स ऑफ प्लांट, पॉवरट्रेन आणि बॅटरी पॅक यांसारख्या महत्त्वाच्या घटकांपासून स्वदेशी बसचे डिझाइन विकसित केले आहे. या डिझाइनमधील बस 9 मीटर लांब आणि 32 सीटांसह वातानुकूलित आहे. ही बस 30 किलो हायड्रोजनमध्ये 450 किलोमीटरचा प्रवास करेल.
फ्युएल सेल हायड्रोजन हवेचा वापर करून बस चालवण्यासाठी वीज निर्माण करते. या बसमधून फक्त पाणी बाहेर पडते. त्यामुळे ही बस पर्यावरणासाठी अनुकूल आहे. डिझेलवर लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणारी एक बस वर्षाला तब्बल शंभर टन कार्वब बाहेर टाकते. अशा दहा लाखांपेक्षा जास्त बस भारतात आहेत. त्यामुळे पर्यावरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
हायड्रोजन निर्मितीमुळे शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होणार आहे. शिवाय डिझेलएवजी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. शिवाय डिझेल आयात करण्याचा खर्च कमी होईल. सेंटियंट लॅबद्वारे विकसीत करण्यात आलेले हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे.
सेंटियंट लॅबचे अध्यक्ष रवी पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, "स्वदेशी स्वरूपात हायड्रोजन इंधन सेल बस विकसीत करत असताना आम्हाला अभिमान वाटत आहे. CSIR-NCL सोबत टेक्नीकल टीमने यासाठी खूप काम केले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांसाठी शून्य टक्के कार्बनचा मार्ग तयार करण्यासाठी सक्षम करण्याला आमचे प्रयत्न राहतील."
सेंटियंट लॅबचे संचालक डॉ. रधुनाथ माशेलकर याबाबत बोलताना म्हणाले, “जगभरात हरीत हायड्रोजन क्रांतीशी संबंधित प्रयत्न सुरू आहेत, परंतु सेंटियंट लॅब्स वेगळ्या प्रयत्नात आहेत. सेंटियंटमध्ये भारतासमोरील आव्हाने समजून घेतली जातात आणि त्यावर उपाय शोधले जातात. डिजिटायझेशन, विकेंद्रीकरण आणि डीकार्बोनायझेशन ही भारताला शाश्वत गतिशीलतेसाठी आवश्यक आहे.