Jalgoan Rancho : मुलाचा गाडी घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी शेतमजूर बापाने भंगारातील साहित्य वापरुन जीप बनवली
Jalgaon News : नवी चारचाकी घेण्याची ऐपत नसलेल्या बापाने मुलाचा गाडी घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी भंगरातील साहित्याचा वापर करुन जीप बनवल्याचा अनोखा प्रकार जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावात समोर आला आहे.
Jalgaon News : मित्रांप्रमाणे आपल्याकडेही चारचाकी वाहन असावं, असा हट्ट करणाऱ्या शेतमजूर बापाने स्वतःच जीप (Jeep) तयार केली. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाकोद गावात शेतमजूराने ही जीप बनवली. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी बापाने बनवलेली ही जीप चर्चेचा विषय बनली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ज्ञानेश्वर जोशी हे शेतमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले आहेत. मजुरीमध्ये जेमतेम घर चालवणारे जोशी यांच्या मोठ्या मुलाने म्हणजेच अर्णवने मित्रांकडे ज्याप्रमाणे चारचाकी वाहन आहे त्याप्रमाणे आपणही वाहन खरेदी करावं, असा हट्ट धरला होता. मुलगा रोजच गाडीसाठी हट्ट करु लागल्याने ज्ञानेश जोशी यांची चिंता वाढली होती. अशातच त्यांच्या मित्राच्या गॅरेजजवळ उभं असताना, मित्र एका कारची दुरुस्ती करत असताना पाहिलं. यावरुन त्यांना मुलासाठी घरच्या घरी कार बनवण्याची कल्पना सुचली.
मित्राच्या सहाय्याने गाडी बनवली
त्यांनी ही कल्पना आपल्या मित्राला सांगितली. मित्रानेही त्यांना लहान आकारात दुचाकीचे इंजिन वापरुन कार बनवणे शक्य असल्याचा सल्ला दिला. त्याचा सल्ला ऐकून उत्साह संचारलेल्या ज्ञानेश जोशी यांनी भांगरातून गाडीसाठी लागणारे साहित्य गोळा केलं आणि मित्राच्या सहाय्याने गाडी बनवण्यास सुरुवात केली. बालपणपासून गॅरेजचं काम करणाऱ्या मित्रांसोबत राहिल्याने जोशी यांना तांत्रिक बाबी चांगल्याप्रकारे माहित होत्या. त्यामुळे गाडी बनवण्यासाठी तांत्रिक बाबींची फारशी माहिती इतरांकडून घ्यावी लागली नाही.
40 ते 50 किमीचा अॅव्हरेज
ही गाडी बनवत असताना जोशी यांनी यू ट्यूबमधील तांत्रिक बाबींचीही काही वेळा मदत घेतली. गाडी बनवत असताना महेंद्राची थार ही गाडी बनवण्याच्या दृष्टीने सोपं असल्याचं लक्षात आलं. यानंतर जोशी यांनी महेंद्राची ही जीप लहान आकारात बनवण्याचा निर्णय घेतला. जवळपास सत्तर हजार रुपये खर्च करुन आणि सलग दोन महिने काम करुन जोशी महेंद्राची थार या प्रकारातील लहान आकारातील जीप बनवण्यात यश मिळवले आहे. जोशी यांनी बनवलेल्या या जीपमध्ये चार जण सहजरित्या बसू शकतात. त्याचबरोबर चाळीस ते पन्नास किमीचा अॅव्हरेज असल्याने आर्थिक दृष्ट्या परवडणारी असल्याचं मतही जोशी यांनी व्यक्त केलं आहे.
गाडी पाहण्यासाठी नागरिकांचा गराडा
आपली परिस्थिती नसल्याने नवी गाडी घेणे शक्य नसल्याने मुलाचा गाडी घेण्याचा हट्ट आपल्याला पुरवता येत नव्हता. मात्र याच अडचणीतून आपण एका नव्या गाडीची निर्मिती करु शकलो आणि मुलाचा हट्ट पुरवू शकलो याचा आपल्याला खूप आनंद झाल्याचं ज्ञानेश्वर जोशी यांनी म्हटलं. सध्या ही गाडी घेऊन ज्ञानेश जोशी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी नागरिकांचा त्यांच्याभोवती गराडा होत असल्याचं दिसू लागलं आहे
मित्रांप्रमाणे आपल्याकडेही चारचाकी गाडी असावी अशी आपली इच्छा होती. वडिलांनी घरच्या घरी गाडी बनून देत हट्ट पुरवल्याने खूप आनंद झाल्याचं ज्ञानेश जोशी यांचा मुलगा अर्णवने म्हटलं आहे.
तर वाकोड इथे राहणाऱ्या ज्ञानेश जोशी यांनी बनवलेली गाडी खूप चांगली आहे. मुलाच्या हट्टपायी बापाने उधार, उसनवार करुन मुलासाठी गाडी बनवून दिली. त्यांच्या या कार्याला सलाम केला पाहिजे, अस मत परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.