Electric Car : टेस्लाची इलेक्ट्रिक कार दिसणार भारतीय रस्त्यांवर, लवकरच होणार घोषणा, कारची किंमत किती?
एलन मस्कची (Elon Musks) कंपनी टेस्ला इंक (Tesla) लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. भारतासोबतचा करार अंतिम होण्याच्या अगदी जवळ आहे.
Electric Car : भारतीय वाहन क्षेत्रात झपाट्याने विद्युतीकरण होत आहे. जवळजवळ प्रत्येक आघाडीच्या ब्रँडची नजर वाढत्या भारतीय बाजारपेठेवर आहे. या शर्यतीत आता अमेरिकन कंपनी टेस्ला देखील येत आहे. एलन मस्कची (Elon Musks) कंपनी टेस्ला इंक (Tesla) लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. भारतासोबतचा करार अंतिम होण्याच्या अगदी जवळ आहे. जर सर्व काही सुरळीत झाले, तर पुढील एका वर्षात टेस्ला कार भारतीय रस्त्यावर धावताना दिसतील.
टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मिळालेल्या माहितीनुसार भारत अमेरिकन ऑटोमेकर टेस्ला इंकबरोबर कराराला अंतिम रूप देण्याच्या मार्गावर आहे. ज्यामध्ये भारतात कारखाने आणि कार आयात करण्याची चर्चा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारत अमेरिकन ऑटोमेकर टेस्ला इंक. बरोबर कराराला अंतिम रूप देण्याच्या मार्गावर आहे. ज्या अंतर्गत कंपनी पुढील वर्षापासून देशात आपली इलेक्ट्रिक वाहने आयात करण्यास सक्षम असेल. दोन वर्षाच्या कालावधीत कारखाना सुरु करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट दरम्यान अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
भारतात टेस्लाचा प्लांट कुठे?
टेस्लाच्या भारत प्रवेशाची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि पीएम मोदी यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चेला आणखी उधाण आले होते. त्यानंतर एलन मस्कने भारतात टेस्ला कार लॉन्च करण्याबाबत आणि प्लांट उभारण्याबाबत चर्चा केली. टेस्लाचा प्लांट भारतात कुठे असेल याबाबत अद्याप निर्णय झाला नसला नाही. मात्र गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये त्यांच्या पायाभूत सुविधांचा विचार करुन प्लांट उभारण्याचा विचार केला जात आहे.
टेस्ला भारतात 2 अब्ज डॉलर गुंतवणार
टेस्ला भारतात नवीन प्लांटमध्ये सुरुवातीला सुमारे 2 अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखत आहे. एवढेच नाही तर कंपनी भारतातून सुमारे 15 अब्ज डॉलर्सचे ऑटो पार्ट्स खरेदी करण्याचा विचार करत आहे. याशिवाय, असे देखील बोलले जात आहे की कारच्या किंमती कमीत कमी ठेवण्यासाठी टेस्ला भारतात बॅटरी तयार करु शकते. या योजना अद्याप अंतिम झालेल्या नाहीत आणि बदलाच्या अधीन आहेत. एलन मस्क यांनी जूनमध्ये सांगितले होते की, टेस्ला 2024 पर्यंत भारतात "महत्त्वपूर्ण गुंतवणूक" करण्याचा विचार करत आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठेत वाढ
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी, देशात विकल्या गेलेल्या एकूण प्रवासी वाहनांमध्ये केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा सुमारे 1.3 टक्के होता. जो यावर्षी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच कॅलिफोर्नियातील टेस्लाच्या कारखान्याला भेट दिली आणि त्यांनी या भेटीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. मात्र, यावेळी ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना भेटू शकले नाहीत.
20 लाखांची टेस्ला
टेस्ला कंपनी भारतात स्थापन करण्याच्या विचारात असलेल्या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता अंदाजे 5 लाख इलेक्ट्रिक वाहने असेल. एवढेच नाही तर कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या: