(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad Water Issue : ...तर उद्धव ठाकरे-फडणवीसांनी एकटं फिरुन दाखवावे, लोक हंड्यांनी मारतील : इम्तियाज जलील
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये एकटं फिरुन दाखवावं, त्यांना शहरातील महिला हातातील हंड्यांनी मारतील, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधील पाणी प्रश्नावरुन केली
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला असून, यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. तर याच पाण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 मे रोजी औरंगाबाद शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पण मोर्चा निघण्यापूर्वीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पाणी प्रश्नावरुन भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरात एकटं फिरुन दाखवावं, त्यांना शहरातील महिला हातातील हंड्यांनी मारतील, असं जलील यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या महिन्याभरापासून औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तर याच मुद्यावरुन भाजपकडून 23 तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. तर भाजपच्या मोर्चापूर्वी शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणीपट्टीत 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही मुद्यावरुन जलील यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. "मुख्यमंत्रीसाहेब हे धंदे बंद करा, औरंगाबादकरांना संभाजीनगर नव्हे तर पिण्यासाठी पाणी हवं आहे," असा टोलाही जलील यांनी यावेळी लगावला.
..तर महिला हातातील हंड्यांनी मारतील
तर याचवेळी बोलताना जलील म्हणाले की, "पालकमंत्र्यांनी आता पाणी पट्टी कमी केली आहे. त्यामुळे यापूर्वी पाणी न देता वसूल केलेली पाणी पट्टी व्याजासहित परत केली पाहिजे. तर आता फडणवीस सुद्धा शहरात मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी आपली सुरक्षा हटवून एकट्याने औरंगाबाद शहरातील कोणत्याही वॉर्डात जाऊन फिरुन दाखवावे, त्यांना महिला हातातील हंड्यांनी मारतील."
जलील यांना फोनवरुन शिवीगाळ...
एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतले. तसेच यावेळी त्यांच्यासोबत खासदार इम्तियाज जलील सुद्धा उपस्थितीत होते. त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्राभरातून टीका होत आहे. तर याचवेळी जलील यांना फोन करुन शिवीगाळ देण्याचे प्रकार सुद्धा समोर आले आहेत. शिवीगाळ करतानाची रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशीच एक रेकॉर्डिंग समोर आली असून, ज्यात स्वतःला नितेश राणेंचा कार्यकर्ता म्हणून सांगणाऱ्या गणेश कराळे नावाच्या व्यक्तीकडून जलील यांना शिवीगाळ केली आहे.