राज्यातील 163 महिला एसटी चालकांसह इतरांचं प्रशिक्षण थांबवलं!
एसटी महामंडळात आदिवासी भागातील महिलांच्या हाती लालपरीचं स्टेअरिंग दिल्यानंतर राज्यभरात अन्य महिलांचीही वाहक-चालक पदासाठी भरती केली. त्यांनाही राज्यातल्या वेगवेगळ्या आगारात प्रशिक्षण सुरु केलं. मात्र हे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करत महिला चालक दाखल होणार असल्याचे जाहीर केलं. त्यासाठी राज्यात 163 महिलांची नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षणही सुरु करण्यात आले. परंतु कोरोनाच्या संकटात महामंडळ तोट्यात असल्याचे सांगत महिलांच्या हाती दिलं जाणारं 'एसटी'चं स्टेअरिंग काही काळ लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या 32 महिलांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलं आहे. औरंगाबाद आणि नाशिकमध्ये चालकपदासाठी 32 महिलांची निवड करण्यात आली. यात औरंगाबाद विभागातील सहा महिलांचा समावेश आहे. या महिलांचं औरंगाबादेत प्रशिक्षणही सुरु करण्यात आलं होतं. औरंगाबादच्या रस्त्यावर प्रशिक्षणार्थी महिला एसटी चालवताना पाहून अनेकांना कुतूहलही वाटलं आहे.
वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर या सर्व महिला एसटी चालक म्हणून रुजू होणार असल्याचं सांगण्यात आलं. परंतु एसटी महामंडळाने 17 जुलै रोजी एका पत्राद्वारे सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक-टंकलेखक, राज्यसंवर्ग व अधिकारी पदांमध्ये आणि अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना केली. त्यानुसार औरंगाबादमधील प्रशिक्षणही थांबवण्यात आलं. ही केवळ तात्पुरती स्थगिती असल्याचं विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं. त्यामुळे एसटी महामंडळात 'ती'च्या हाती 'एसटी'चे सारथ्य येणे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
प्रशिक्षण घेणाऱ्या महिला चिंतेत आहेत. प्रशिक्षण पुन्हा कधी सुरु होईल, याची कोणतीही माहिती दिली जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही कालावधीनंतर झालेली निवडच रद्द होण्याची आणि त्यातून एसटीत चालक म्हणून रुजू होण्याच्या स्वप्नांवर विरजण पडण्याची भीती निवड झालेल्या महिला उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
आधी गाजावाजा, आता अन्याय मोठा गाजावाजा करुन महिला चालक नेमण्यात येत असल्याचं सांगितलं. परंतु त्यासाठी सुरु असलेले प्रशिक्षणच बंद करण्यात आलं. हा एकप्रकारे अन्याय आहे. प्रशिक्षण तात्पुरते स्थगित केल्याचं सांगितलं जातं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन महिलांनी चालकपदाची वाटचाल सुरु केली. त्यामुळे प्रशिक्षण पुन्हा सुरु करुन महिलांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शिला नाईकवाडे यांनी केली आहे.