औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी हीच अनुकुल वेळ : सुभाष देसाई
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच अनुकूल वेळ आहे. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते याबाबत लवकरच निर्णय घेतील. काही तांत्रिक गोष्टी आहेत मात्र यावरही तोडगा निघेल, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं.
औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद आहेत. आज पुन्हा एकदा औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ असल्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच ती वेळ आहे. याबाबत बोलताना सुभाष देसाई यांनी म्हटलं की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचं नाव संभाजीनगर केलं होतं. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. शिवाय त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष सोबत आहेत. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते याबाबत लवकरच निर्णय घेतील. काही तांत्रिक गोष्टी आहेत मात्र यावरही तोडगा निघेल, असं सुभाष देसाई म्हणाले. यापूर्वी विभागीय आयुक्तांना तसा प्रस्तावही पाठवलेला आहे. त्यामुळे आता हीच ती वेळ आहे, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असंही सांगायला सुभाष देसाई विसरले नाहीत.
त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून 'संभाजीनगर' मुद्दा पुन्हा चर्चेत आणला जाण्याची शक्यता आहे. हाच मुद्दा भाजपकडूनही चर्चेत येण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या रामा हॉटेलमध्ये सुभाष देसाई यांनी काही उद्योजकांशी संवादही साधला. उद्योगांवर हल्ला निषेधार्हच आहे, तो खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. उद्योजकांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत उद्योजकांना छोट्या-मोठ्या काही अडचणी असतील तर त्याही त्यांनी सांगाव्या म्हणजे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल, असं त्यांनी म्हटलं. उद्योगांवर राज्यात कुठेच असले हल्ले सहन केले जाणार नाही, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध: बाळासाहेब थोरात
कोकणात पूर परिस्थितीमुळे महाड, चिपळूण, लोटे परशुराम या एमआयडीसी भागात मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी दोन आयएएस अधिकारी यांनी पंचनामे केले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. पायाभूत सुविधांचे मोठं नुकसान झालंय ते नुकसान भरून काढणार आहे. सोबतच छोट्या उद्योजकांचे नुकसान झाले आहे, त्यांना काय मदत करता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितलं. छोट्या उद्योजकांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासन मदत करण्यास तत्पर राहील, असं आश्वासनही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं.
प्रत्येक शहराच्या भावना वेगळ्या; नागरिकांशी चर्चा करुन मार्ग काढू : सुप्रिया सुळे