Maharashtra Governor : 'माझ्यावर भाजपचा दबाव असल्याचं कोश्यारी म्हणाले होते'; चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट
Chandrakant Khaire: माझ्यावर भाजपच्या वरिष्ठांचा खुप दबाव असल्याचं राज्यपालांनी माझ्याकडे कबूल केले होते, असा दावा खैरे यांनी केला आहे.
Chandrakant Khaire On Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून, याचे राजकीय पडसाद उमटत आहे. तर यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर भाजपच्या वरिष्ठांचा खुप दबाव असल्याचं राज्यपालांनी माझ्याकडे कबूल केले होते, असा दावा खैरे यांनी केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, भाजपने हा निर्णय घेण्यासाठी खूप उशीर केला आहे. राज्यपाल यांनी अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केली. एकदा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना विचारले होते की, 12 आमदारांच्या नियुक्तीचं काय झाले. तर त्यांनी सांगितले की, माझ्यावर भाजपचा खूप दबाव आहे. त्यांनी माझ्याकडे तशी कबुली दिली होती. त्यांच्यावर भाजप आणि वरिष्ठांकडून दबाव होता. त्यामुळे त्यांना असे वागावे लागत आहे. त्यांनी स्पष्टपणे मला सांगितले असल्याचे खैरे यांनी सांगितले. मला येथून पळून जावे असं वाटत असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते, असा दावा खैरे यांनी केला आहे.
राज्यपाल यांनी आधीच जायला पाहिजे होते
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर बसणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था झाली आहे. लोकांनी त्यांचा निषेध केला, त्यांना जोडे मारले. त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे जाळले. हे फक्त त्यांच्या स्वभावामुळे झाले आहे. त्यांनी आमच्या औरंगाबाद शहरात येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांनी आधीच जायला पाहिजे होते, असेही खैरे म्हणाले.
भगतसिंह कोश्यारी अन् चर्चा...
- मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून वेगळेपण दाखवले. त्यांनी मराठीतून अभिभाषण केले होते. राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर कोरोनाची साथ आल्यानंतरही भाजपचे नेते वारंवार राज्यपालांकडे जाऊन भेटी घेत होते. त्यामुळं सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
- उद्धव ठाकरेंची आमदार म्हणून नेमणूक करायला कोश्यारींनी विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंचा आमदार व्हायचा मार्ग मोकळा केला.
- विद्यापीठाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरुनही राज्य सरकारच्या विरोधात कोश्यारींनी भूमिका घेतली. त्यावेळी संघर्ष टाळून राज्य सरकारने कुलपती असलेल्या राज्यपालांचं म्हणणं मान्य केलं. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोश्यारींना केलेल्या नमस्काराचा फोटो राजभवनने जारी केला आणि त्यावर सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली.
- गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केले होते.
- समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.
- महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त वक्तव्य
- नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत असे वक्तव्य त्यांनी केलं होतं.
- छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातले आदर्श आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
- आघाडी काळातील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मंजुर न केल्याने राज्यापालांविषयी संताप
राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने पक्षीय राजकारण करणं अपेक्षित नसतं. पण ते भाजपला झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar : महाराष्ट्राची सुटका झाली, कोश्यारींनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी : शरद पवार